अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- पारनेर तालुक्याच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी स्वतःच्या आवाजातील एक खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल केल्यामुळे तालुक्यासह राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे.
आत्महत्या केलेल्या वनाधिकारी दीपाली चव्हाण यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात अप्रत्यक्षपणे थेट आत्महत्याचाच इशारा दिला आहे. यात त्यांनी थेट कोणाचेही नाव घेतले नसले तरी या क्लिपमध्ये लोकप्रतिनिधी असा उल्लेख केल्याने त्यांचा रोख पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्याकडेच जातो.
तहसीलदारांच्या आरोपांवर आ. लंके यांनीही प्रत्यारोप केला असून केवळ भ्रष्टाचारातून बचावासाठीच हा केविलवाणा प्रयोग केल्याचे आ. लंके यांनी सांगितले. दरम्यान,लोकप्रतिनिधीच्या त्रासाला कंटाळुन महिला अधिकाऱ्याला आत्महत्येचा इशारा द्यावा लागत आहे. ही बाब गंभीर असून या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
आ. निलेश लंके यांचे स्पष्टीकरण – निलेश लंके म्हणाले, “तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिप व्हायरल करून केविलवाणा प्रयत्न केला. ज्योती देवरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झालेत. तसा अहवाल नाशिक विभागीय आयुक्तांनी पाठवला आहे. तहसीलदारांना सूचना केल्या तर त्यांनी मला देखील आत्महत्या करण्याचे मेसेज रात्री-अपरात्री केले. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने बचावासाठी केलेला हा प्रयत्न आहे.”
भाजपाच्या चित्रा वाघ यांची मागणी – चित्रा वाघ म्हणाल्या, “पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडीयो क्लीप ऐकली आणि मन सुन्न झालं. सत्तेतले हे बेलगाम घोडे. देवमाणूस म्हणून मिरवणाऱ्या पारनेरच्या या लोकप्रतिनिधींच्या नाकात वेसणं घालायचं काम महिला सशक्तीकरणाच्या बाता मारणाऱ्यांकडून होतंय का तेचं आता पहायचंय.”
पारनेर तालुक्याचा बिहार झाला ! माजी जिल्हा परिषद सदस्य सुजित झावरे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली सुजित झावरे म्हणाले, पारनेर तालुक्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांसह सामान्य नागरिकांना काम करणे अवघड झाले आहे. तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर असून पारनेर तालुक्याचा बिहार झाला आहे. देवरे यांनी स्पष्टपणे लोकप्रतिनीधी म्हटले आहे. यावरून कोणाचा त्रास आहे हे स्पष्ट आहे, असे सुजित झावरे यांनी नाव न घेता आमदार नीलेश लंके यांच्यावर टीका केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांचे पत्र – नगर जिल्ह्यातील पारनेरच्या तहसिलदार श्रीमती ज्योतीताई देवरे यांनी १९ मिनिटांची एक ऑडियो क्लिप जारी करून अनेक गंभीर आरोप स्थानिक लोकप्रतिनिधीवर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर केले आहेत. लसीकरणावरून काही कर्मचाऱ्यांना पोलिस अधिकाऱ्यांच्या समोर मारहाण करणे,
अश्लील शिविगाळ करणे, महिला कर्मचाऱ्यांना मारण्यासाठी महिला पोलिसांना बोलाविण्यास सांगणे, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांपर्यंत प्रकरण नेल्यानंतर तहसिलदार ज्योतीताई देवरे यांच्याच बदनामीचा प्रयत्न करणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही त्यांना धमक्या प्राप्त होणे, कोरोना काळात नियमांचे पालन करण्याचा प्रयत्न करीत असताना
त्यातही अडचणी उत्पन्न करणे आणि मग थेट मंत्र्यांकडे त्यांच्या बदलीची शिफारस करणे, यातून महिला अधिकाऱ्यांचे खच्चीकरण करणे, असे अनेक गंभीर आरोप त्यांनी केले आहेत. थेट दीपाली चव्हाण प्रकरणाचा उल्लेख करून मी सुद्धा तुझ्याकडे येतेय्, हा त्यांचा ऑडिओमधील आवाज अंगावर शहारे आणणारा आहे.
एक स्त्री अधिकारी आपले कर्तव्य पार पाडत असताना संपूर्ण यंत्रणाच तिचे मानसिक खच्चीकरण करीत असेल आणि परिणामी त्या महिला अधिकाऱ्याला आत्महत्येचा इशारा द्यावा लागत असेल तर ही बाब अतिशय गंभीर आणि मनाला वेदना देणारी आहे. खरे तर कोरोना काळात संपूर्ण यंत्रणा दबावात काम करीत असताना
त्यांना आणखी नाहक त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाणे अतिशय आवश्यक आहे. माझी आपल्याला विनंती आहे की, आपण यात तत्काळ लक्ष घालून हस्तक्षेप करावा. या महिला अधिकाऱ्याला आपण स्वत: बोलावून घेऊन त्यांची तक्रार ऐकून घ्यावी आणि त्यांच्या व्यथा समजून घ्याव्यात आणि तत्काळ त्यावर तोडगा काढून त्या अधिकाऱ्याला दिलासा द्यावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात एखाद्या महिला अधिकाऱ्याची इतकी अवहेलना होऊ नये, हीच कळकळीची विनंती !
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम