Maharashtra News : मागील सलग तीन दिवस मुंबई, ठाण्यात वाढलेल्या पाऱ्यामुळे नागरिकांना उन्हाच्या चटक्यांना सामोरे जावे लागले. मुंबईत ३८ अंश सेल्सिअसच्यावर, तर ठाण्यात ४२ वर पोहचलेल्या पाऱ्यामुळे उन्हाच्या झळांनी अंगाची काहिली झाली.
हे उच्चांकी नोंदवलेले तापमान बुधवारी चार अंशांनी खाली आल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. मुंबईत ३४.२ अंश, तर ठाण्यात ३८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. पुढील काही दिवस मुंबईतील उष्णतेच्या लाटेची शक्यता कमी असेल, असे प्रादेशिक हवामान विभागाकडून सांगण्यात आले.
मुंबई, ठाणे परिसरात सलग तीन दिवस उष्णतेच्या लाटेने नागरिक हैराण झाले. रविवारी, सोमवारी पारा उच्चांकी नोंदवला गेला. सोमवारी एक-दोन अंशांनी पारा खाली आला, मात्र उन्हाची काहिली कायम राहिली. बुधवारी पारा चार अंशांनी खाली आला. वातावरण उष्ण व दमट राहिले. मुंबईत ३८ अंशावर नोंदवले गेलेल्या तापमानात बुधवारी घट होऊन ते ३४.२, तर ठाण्यातील ४२ वर गेलेला पारा ३८ अंश सेल्सिअस नोंदवला गेला. मात्र उन्हाच्या चटक्यांना नागरिकांना सामोरे जावे लागले.
■ उष्माघाताची लक्षणे प्रौढ
शरीराचे तापमान ४० अंश सेल्सिअस पार गेल्यास स्नायू आखडणे, मळमळ उलटीचा त्रास, चक्कर येणे, हृदयाचे ठोके वाढणे.
■लहान मुले
जेवणास नकार, लघवीचे प्रमाण कमी होणे, रक्तस्राव होणे, तोंडाची त्वचा कोरडी पडणे.
■अशी काळजी घ्या
उन्हाचा त्रास होत असल्यास सावलीत बसावे. सैल कपडे घालावे, सतत पाणी पित राहा. शक्य तितका वेळ वारा घालणे.