शैक्षणिक वर्ष सुरु मात्र अद्यापही विद्यार्थ्यांपर्यंत पोहचेना पाठ्यपुस्तके

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच क्षेत्रांवर मोठा परिणाम झाला आहे. यातच याचा अधिक परिणाम शैक्षणिक व्यवस्थेवर देखील झालेला दिसून येत आहे.

शैक्षणिक वर्ष सुरु झाले मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता शाळा अद्यापही बंद ठेवण्यात आले असून ऑनलाईन शाळा सुरु आहे. मात्र आता या शिक्षणात विद्यार्थ्यांना एका महत्वपूर्ण अडथळ्यांचा सामना करावा लागतो आहे.

सर्व शिक्षा अभियानांतर्गत राज्य शासनामार्फत जिल्हा परिषदेसह सर्व अनुदानित शाळांच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. शाळेच्या पहिल्याच दिवशी त्याचे वाटप होते.

नगर जिल्ह्यात पहिली ते आठवीपर्यंत ४ लाख ६६ हजार विद्यार्थी असून त्यांना २४ लाख २० हजार पाठ्यपुस्तकांची गरज आहे. मागील वर्षी कोरोनामुळे जूनअखेर ही पुस्तके वाटप करण्यात आली होती.

यंदाही शाळा सुरू झाल्या नसल्या तरी मुलांना पुस्तकांचे वाटप होणार आहे. दरम्यान, कोरोनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांकडे पुस्तके सुस्थितीत असतील तसेच शासनाची आर्थिक स्थिती लक्षात घेता पुस्तकांचा पुनर्वापर व्हावा या हेतूने मागील वर्षीची पुस्तके गोळा करण्याचे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले होते.

शिक्षकांनी सुटीमध्ये ही पुस्तके गोळा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, एक लाखाच्या आसपासच पुस्तके जमा होऊ शकली. त्यामुळे उर्वरित २३ लाख पुस्तकांची मागणी जिल्हा परिषदेकडून शासनाकडे करण्यात आली आहे.

परंतु शाळा सुरू होऊन १८ दिवस झाले तरी अद्याप पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेली नाहीत. बालभारतीकडून या पुस्तकांची छपाई होऊन ती पुस्तके तालुकास्तरापर्यंत व तेथून केंद्रस्तरापर्यंत पोहोच केली जाणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe