अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- एक महिन्यापूर्वी श्रीरामपूर तालुक्यातील किराणा व भुसार आडत व्यापारी बंधुंनी माळवाडगाव पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची देणी बुडवून पोबारा केला असून,त्याबाबत अद्याप कोणतेही ठोस धागेदोरे हाती लागले नाहीत.
त्यामुळे संतप्त पीडित शेतकरी संघर्ष कृती समितीतील शेतकऱ्यांनी बैठक घेऊन व्यापाऱ्याच्या परिवारातील फोटो प्रसिद्ध करून माहिती देणाऱ्यास पाच लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. माळवाडगाव येथील ‘त्या’ व्यापारी कुटुंबाने बायका मुलांसह महिन्याभरापूर्वी ६ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री पळ काढला.

माळवाडगावसह पंचक्रोशीतील गावातील हजारो शेतकऱ्यांचे २५ कोटी, बँका, पतसंस्था, भिशी चालक, सोयाबीन मील, किराणा, भुसार व्यापारी अशांचे एकूण ४० कोटी रूपयांना चुना लावला आहे.
याबाबत श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद, जालना, मालेगाव, मुंबई, ठाणे, टिटवाळा येथे जाऊन तपास केला. या तपासात काहीही ठोस धागेदोरे हाताला लागले नाही.
मात्र टिटवाळा येथे त्याची मोटारसायकल मेहुण्याकडे आढळून आली. त्यामुळे त्यास पथकाने तपासकामी ताब्यात घेऊन बरोबर आणले होते. या परिवाराने पळून जाण्याच्या दिवशी या मेहुण्याची लोणी, संगमनेरपर्यंत मदत घेतली. परंतु आम्ही पळून चाललो असल्याची त्याला कल्पना येऊ न देता मोटारसायकल माझ्या ताब्यात देऊन कारमधून मलाही चकवा दिला.
त्यानंतर कोणत्या शहराकडे पोबारा केला हे सांगता येत नाही.अशी माहिती त्याने पोलिसांना दिली. या परिवाराचे सर्व मोबाईल स्वीच ऑफ असले तरी एक मोबाईल काही दिवस सुरू असल्याचे निदर्शनास आले. एक महिन्याचे कॉल रेकॉर्ड काढल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्यांची पोलीस चौकशी करत आहेत.
आज तब्बल एक महिना पुर्ण झाल्याने पोलीस पथकास मदत करणाऱ्या कार्यकर्त्यांसह पिडीत शेतकऱ्यांनी बैठक घेऊन यांचा ठावठिकाणा सांगणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेऊन पीडित शेतकरी संघर्ष कृती समितीच्यावतीने त्यास पाच लाख रूपयांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|