नेवासा येथील ‘त्या’ दुकानदारांबाबत दोन दिवसात प्रशासन घेणार मोठा निर्णय; पालकमंत्री विखे पाटील यांनी तहसीलदारांना दिले ‘हे’ आदेश

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : नेवासा येथील १४ दुकानांना शॉर्टसर्किटने आग लागल्याने दुकानदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. दरम्यान, या घटनास्थळाची पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाहणी करु व्यावसायिकांशी चर्चा केली प्रशासनाला पूर्ण मदत करण्याचे आदेश याप्रसंगी पालकमंत्र्यांनी दिले.

दोन दिवसांत जिल्हास्तरीय जिल्हाधिकाऱ्यांसह व सर्व व्यापाऱ्यांची बैठक घेऊन नुकसानीबाबत निर्णय घेण्यात येईल. त्यांचे पुनर्वसन करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री विखे पाटील यांनी नुकसानग्रस्त व्यावसायिकांना यावेळी दिले.

दरम्यान यावेळी जळीतग्रस्त व्यापार्‍यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. पालकमंत्र्यांनी व्यापार्‍यांशी संवाद साधत तहसीलदारांना सोमवारी तातडीने बैठक घेऊन दुकानदारांना नगरपंचायतीच्या गाळ्यांमध्ये तात्पुरत्या स्वरुपात गाळे खुले करून देण्याबाबत मार्ग काढण्याचा आदेश दिला.

नेवासा येथील १४ दुकानांना शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीच्या घटनास्थळाची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रविवारी पाहणी केली. याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, सरचिटणीस नितीन दिनकर, जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा, ज्ञानेश्वर पेचे, ऋषिकेश शेटे, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी, विष्णू मुरकुटे, नगरसेवक सुनील वाघ, डॉ. करणसिंह घुले, मनोज पारखे यांच्यासह नुकसान झालेले दुकानदार व नागरिक उपस्थित होते.

नेवासा शहरातील नगरपंचायत चौकात शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत १४ दुकाने बेचिराख झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

नगरपंचायत समोरच झालेल्या या जळीत कांडाच्या परिस्थितीचे अवलोकन करुन परिस्थितीच्या उपाययोजनेसाठी नगरपंचायतीचा एकही अधिकारी आणि प्रशासक असलेल्या तहसिल कार्यालयाचे अधिकारी आणि कर्मचारी शनिवारी सुट्टी असल्याचा बहाणा पुढे करत उपलब्ध झाले नसल्यामुळे नेवासकरांतून प्रशासनाच्या लहरी कारभाराबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.

नेवासा नगरपंचायतीच्या आपत्कालीन स्थितीच्या उपाययोजनेसाठी असलेले दोन कर्मचारी नगरपंचायत चौकात बसून आहेत. त्यामुळे अधिकार्‍यांच्या असंवेदनशील व बेजबाबदार वर्तणुकीचा नेवासा शहरातून निषेध व्यक्त केला जात आहे.

यावेळी नेवाशातील दुकान गाळे जळून खाक झाल्याच्या दुर्घटनेत सुमारे एक कोटी पंधरा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा केलेला असून महसूल प्रशासनाला पंचनाम्यानुसार मदत करण्याचे आदेश दिले.

आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून आम्हास उदरनिर्वाह करण्याचे साधन राहिलेले नाही. तरी तलाठी व मंडलाधिकारी यांनी केलेला स्पॉट पंचनामा ग्राह्य धरण्यात यावा व लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी व आम्हास उदरनिर्वाह करण्यास मदत मिळावी, असे निवेदन नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांच्यावतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe