अहमदनगर Live24 टीम, 20 एप्रिल 2021 :-केंद्रातील मोदी प्रणित भाजप सरकारने हिंदुत्व व मतांचे राजकारण करुन सत्ता अबाधित ठेवण्यासाठी देशवासियांना कुंभमेळ्यातून कोरोना महामारीच्या खाईत लोटल्याचा निषेध पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने नोंदविण्यात आला आहे.
निवडणुकांतील मत व सत्तेसाठी देव, धर्माचा बाजार भाजपने मांडला असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
उन्नतचेतनेला डावलून हिंदू धर्मातील कर्मकांड व ग्रंथांमधील श्रद्धेला आहारी जाऊन हरिद्वार येथे केंद्र सरकारने कुंभमेळा भरविण्यास परवानगी दिली. मृत्यूनंतर स्वर्गाच्या लाभापोटी लाखोंच्या संख्येने भाविक या कुंभमेळ्यात सहभागी झाले.
देशात कोरोना महामारीची दुसरी लाट असतानादेखील हा कुंभमेळा भरविण्यात आला. हिंदू मतांवर डोळा ठेऊन केंद्र सरकारने कुंभमेळाव्यास परवानगी दिली. यामध्ये हजारो साधू व लाखो भाविक एकत्र आल्याने कोरोनाचा प्रसार झाला आहे.
तर सत्ता मिळवण्यासाठी भाजपने पश्चिम बंगाल व इतर राज्यांच्या निवडणुकांमध्ये लाखोंच्या संख्येने प्रचार रॅलीकाढून सभा घेतल्या. कोरोना महामारीत उन्नतचेतनेशी फारकत घेऊन वागणारे भाजप सरकारचे धर्म व सत्तांधतेचे पितळ उघडे पडले आहे.
कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेत अनेक शिकण्यासारख्या गोष्टी होत्या, मात्र भाजपच्या मत व सत्ता उपभोगण्याचा परिणाम सर्वसामान्यांना भोगावा लागणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
केंद्र सरकारने देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कुंभमेळा व पश्चिम बंगालच्या निवडणुकांमध्ये नियंत्रण आणणे आवश्यक होते. हिंदू मतांवर परिणाम होण्याच्या भितीने भाजप सरकारने आपले कर्तव्य पार पाडले नसल्याने देशात कोरोनाचा उद्रेक झाला आहे.
परतीच्या प्रवासावर असलेले कुंभमेळ्यातील भाविकांमुळे कोरोनाचे संक्रमण अधिक झपाट्याने पसरण्याची शक्यता आहे. भारतात देव, धर्माच्या नावावर चालू असलेला हा प्रकार पाहून संपुर्ण जग हसत आहे.
विवेक गहाण ठेऊन केंद्र सरकारची वागणुक राहिली आहे. देशातील ऑक्सिजनचा तुटवडा व आरोग्य व्यवस्था भक्कम करण्याऐवजी कुंभमेळ्यास प्राधान्य दिले गेल्याने देशात अनागोंदी माजली असल्याचा आरोप अॅड. कारभारी गवळी यांनी केला आहे.
संघटनेच्या वतीने अॅड. गवळी, अशोक सब्बन, कॉ. बाबा आरगडे, प्रकाश थोरात, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, अशोक भोसले, हिराबाई ग्यानप्पा आदींनी निषेध व्यक्त केला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|