लसीकरणाचा जो गोंधळ सुरू आहे, त्याला केंद्र सरकार जबाबदार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- ‘राज्यात करोनाची दुसरी लाट आता ओसरताना दिसत आहे. पुणे-मुंबईसह मोठ्या शहरांतही आकडे कमी होत असल्याचे दिसून येत आहे.

ज्या भागात संसर्गाचे प्रमाण जास्त आहे, तेथे विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलेले आहे. लसीकरणाचा जो गोंधळ सुरू आहे, त्याला केंद्र सरकार जबाबदार आहे. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला.

मंत्री पाटील आज निळवंडे धरणाच्या कालव्याची पाहणी करण्यासाठी नगर जिल्ह्यात आले होते. त्यांनी संगमनेर आणि राहुरी तालुत्यात कालव्याच्या कामाला भेटी दिल्या. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे उपस्थित होते.

यावेळी बोलताना पाटील म्हणाले, आपण आपल्या आरोग्य यंत्रणेद्वारे लसीकरणाचे व्यवस्थित नियोजन केले आहे. वेगाने लसीकरण करण्याची क्षमता असून सुरवातीला आपण ती दाखवूनही दिली आहे. मात्र, आता पुरवठाच कमी झाला आहे.

सुरवातीच्या काळात साडेसहा कोटी डोस निर्यात केली.त्याचे दुष्परिणाम आता भोगावे लागत आहेत. केंद्र सरकारने त्यावेळी हे धोरण का घेतले, याचे कारण माहिती नाही. मात्र एवढ्या डोसमध्ये निम्म्या महाराष्ट्राचे लसीकरण होऊ शकले असते,’ असेही पाटील म्हणाले.

निळवंडे कालव्याच्या कामाबद्दल ते म्हणाले, ‘हे काम आता वेगाने सुरू असून २०२२ मध्ये ते पूर्ण होऊन शेतकऱ्यांना कालव्याद्वारे पाणी मिळू शकेल.

यासाठी मंत्री थोरात यांनी मोठा पाठपुरावा केला. मधल्या पाच वर्षांत हे काम रखडले होते. आता त्यासाठी ४९१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पुढील पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे,’ असेही ते म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News