अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- राहाता शहरातील खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाने मुरूम टाकून तात्पुरत्या स्वरूपात बुजवल्याने वाहनधारकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असून सततची वाहतूक कोंडीही कमी झाली आहे.
नगर-मनमाड महामार्गाची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली होती. खड्ड्यातून वाट काढताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. खड्ड्यांमुळे अनेक अपघात घडत आहेत.
थोड्याशा पावसाने नगर-मनमाड महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून सातत्याने होत असलेल्या वाहतूक कोंडीने नागरिकांचे मोठे हाल होत होते.
पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने आज तात्पुरत्या स्वरूपात बांधकाम विभागाने मुरूमाने खड्डे बुजवले आहेत. मात्र रस्त्याचे तात्पुरती मलमपट्टी केल्याने प्रश्न सुटणार नाही.
कोपरगाव, शिर्डी, राहाता, बाभळेश्वर ते कोल्हार या चाळीस किलोमीटर अंतरातील रस्त्यावर मोठमोठे खड्डे हा नित्याचा विषय झाला आहे.
अनेकांना रस्ते अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. आंदोलने करूनही त्याची दखल घेतली जात नाही ही शोकांतिका म्हणावी लागेल.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम