अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-कोरोना काळात मृत पावलेल्या कोरोना रुग्णांच्या अंत्यविधीसाठी माणुसकीच्या भावनेने केलेल्या कार्याची दखल घेत विश्व मानवअधिकार परिषदच्या वतीने साहेबान जहागीरदार यांना कोरोना वॉरीयर व बेस्ट सोशल वर्कर पुरस्काराने गौरविण्यात आले.
जहागीरदार यांच्या कार्याने भारावलेले विश्व मानवअधिकार परिषदचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हाजी सय्यद लाईक यांनी नगरला येऊन आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांना सदर पुरस्काराने सन्मानित केले.
यावेळी नगरसेवक समद खान, विश्व मानव अधिकार अल्पसंख्याकचे प्रदेश अध्यक्ष नवेद शेख, एस.सी.एस.टी.चे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. बाळासाहेब कांबळे, प्रदेश सचिव सय्यद शफी बाबा आदी उपस्थित होते.
आ. संग्राम जगताप म्हणाले की, कोरोनाच्या संकटकाळात साहेबान जहागीरदार यांनी दिलेले योगदान माणुसकीचे प्रतिक आहे. कोरोनाने मृत पावलेल्यांना शेवटच्या क्षणाचा अंत्यविधी त्यांच्या धार्मिक विधी प्रमाणे करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन कार्य केले.
राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देऊन त्यांचे कार्य सुरु आहे. राष्ट्रवादीचा एक पदाधिकारी सामाजिक कार्यात स्वत:ला झोकून कार्य करीत असल्याची अभिमानास्पद गोष्ट असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
प्रदेश अध्यक्ष हाजी सय्यद लाईक यांनी वश्व मानवअधिकार परिषद समाजात मानवतेच्या मुल्यांचे रक्षण करण्यासाठी कार्यरत आहे. जहागीरदार यांनी कोरोना काळात दिलेले योगदान मानवतेच्या दृष्टीने प्रेरणादायी असून,
योग्य व्यक्तीची पुरस्कारासाठी निवड करुन गौरविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाच्या महामारीत शहरासह जिल्ह्यात मृत्यूदर वाढला असताना साहेबान जहागीरदार यांनी सामाजिक बांधिलकी जपत विविध धर्माच्या धर्म विधीनुसार त्यांचा अंत्यविधी होण्यासाठी कार्य केले.
अमरधाम, ख्रिश्चन दफनभूमी तर मुस्लिम कब्रस्तानमध्ये त्यांनी कोरोनाने मृत पावलेल्यांचा अंत्यविधी केला. काहींचे घरचे देखील येण्यास तयार नसताना त्यांनी माणुसकीने अंत्यविधी करण्याचे कार्य केले. अनेक महिने आपल्या कुटुंबापासून दूर विलगीकरणात राहून त्यांनी हे कार्य केले.
त्यांच्या या कार्याची दखल घेत विश्व मानवअधिकार परिषदच्या वतीने जहागीरदार यांना कोरोना वॉरीयर व बेस्ट सोशल वर्कर पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. परिषदेच्या वतीने संपुर्ण भारतात कोरोनाच्या संकटकाळात उत्कृष्ट सामाजिक कार्य करणार्यांना लखनऊ (उत्तरप्रदेश) येथे झालेल्या दिमाखदार कार्यक्रमात सदर पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
काही कामानिमित्त जहागीरदार पुरस्कार घेण्यास उपस्थित राहू न शकल्याने त्यांना नगरमध्ये येऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|