अहमदनगर Live24 टीम, 17 जुलै 2021 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसीतील सभांत काळे मास्क आणि काळ्या टोप्या उतरवण्यात आल्या. म्हणजे इतके तगडे व मजबूत नेतृत्व असतानाही देश व सुरक्षित नाही, असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या वाराणसी दौऱ्यावरून शिवसेनेनं पुन्हा एकदा केंद्र सरकारला चिमटा काढला. वाराणसीतील आयआयटी- बीएचयू मैदानावर गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी १५०० कोटींच्या अनेक विकास प्रकल्पांचा शिलान्यास केला.
या कार्यक्रमावेळी लोकांच्या तोंडावरील काळे मास्क आणि डोक्यावरील काळ्या टोप्या हटवण्यात आल्या. सुरक्षेचा भाग म्हणून हे करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. मात्र, या मुद्द्यावरून शिवसेनेनं केंद्राला सामनाच्या अग्रलेखातून केंद्राला सुनावलं. सध्या आपल्या देशात सुरक्षेच्या नावाने अतिरेकच सुरू आहे.
बरे, ही सुरक्षा कोणाची, तर देशातील पाच-दहा प्रमुख सत्ताधारी राजकीय मंडळींची (काही धनदांडग्यांचीही). पंतप्रधान, राष्ट्रपती, गृहमंत्री यांच्या सुरक्षा व्यवस्थेस प्राधान्य द्यायला हवेच. मात्र अति तेथे माती झाली तर तो टवाळखोरीचाच विषय होतो.
आता आपले पंतप्रधान मोदी हे आपल्या स्वतःच्या मतदारसंघात म्हणजे वाराणसीला गेले. तेथे त्यांनी योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले. योगी महाराजांनी कोरोनाची दुसरी लाट कशी हिमतीने रोखली हे जाहीरपणे सांगितले (गंगेत कोरोनाग्रस्तांची प्रेते वाहत होती हे विसरून जा.) पंतप्रधान मोदींचे भाषण वाराणसी येथील बीएचयू, आयआयटी मैदानावर झाले.
तेथे काळे कपडे घातलेल्या लोकांना प्रवेशबंदी करण्यात आली. आश्चर्य असे की, पोलिसांनी श्रोत्यांच्या तोंडांवरील काळे मास्कही काढायला लावले. म्हणजे त्या गर्दीत बरेच लोक ‘मास्क’शिवाय बसले. कारण तोंडावरचे काळे मास्क खेचून काढले. काळे मास्क काढण्याचे कारण काय?
तर पंतप्रधानांची सुरक्षा! जगभरात दोन रंगांचेच मास्क जोरात चालले आहेत. पांढरे आणि काळे! आपल्या देशात पंतप्रधानांच्या सभांना यापुढे ‘काळे’ मास्क चालणार नाहीत, असा अप्रत्यक्ष आदेश पंतप्रधानांच्या सुरक्षा यंत्रणांनी दिला आहे,” अशी टीका शिवसेनेनं केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम