अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- आज एकीकडे कोरोनाच्या प्रादुर्भावाने मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी व वित्तहानी झाली. यातून कुठे बाहेर पडत असतानाच नंतर प्रचंड महागाई वाढली. या एका पाठोपाठ आलेल्या संकटात सर्वसामान्य माणूस दोन वेळच्या अन्नासाठी वणवण करत आहे.
तर दुसरीकडे रेशन दुकानातील तांदूळ खुल्या बाजारात नेऊन तो चढ्या भावाने विकण्याचे पाप काहीजण करत आहेत. असेच रेशनचा तांदूळ चढ्या भावाने विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका आरोपीस कर्जत पोलिसांनी जेरबंद केले आहे. अमोल जयसिंगकर (रा.देशमुखवाडी ता.कर्जत)असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राशीन-करमाळा रस्त्यावर कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयासमोर सायंकाळी पाचच्या सुमारास बोलेरो कंपनीची (एम.एच.४२ ए.क्यू. ६१५७) ही पिक-अप पोलिसांना आढळून आली.
पोलिसांना या वाहनात प्रत्येकी ५० किलो वजनाच्या व १० हजार किमतीच्या सुमारे १० गोण्या हाती लागल्या आहेत. पोलिसांनी संबंधित तांदूळ व ५ लाख रु. किमतीची बोलेरो पिक-अप जप्त केली आहे.
आर्थिक फायद्याकरता तांदळाची काळ्या बाजारात विक्री करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम