महामानवांच्या प्रेरणेने जातीय विषमता नष्ट करण्याचा निर्धार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :- पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने हुतात्मा स्मारकात महात्मा फुले यांना जातीसंहिता मुक्तीनायक तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महासत्यबोधी अशी मानवंदना देण्यात आली.

तर या महामानवांच्या प्रेरणेने जातीय विषमता नष्ट करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी अ‍ॅड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, विठ्ठल सुरम, शाहीर कान्हू सुंबे आदींसह कार्यकर्ते या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी झाले होते.

भारतीय उपखंडात उन्नतचेतनाशाहीचा पाया महात्मा फुले यांनी घातला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र्योत्तर काळात जातीच्या उतरंडी नष्ट होण्यासाठी उन्नतचेतना राज्याची स्थापना केली.

हजारो वर्षे भारतीय उपखंडातील सत्ताधारी निसर्ग तत्त्वांना पायदळी तुडवून बायोलॉजिकल हार्डवेअर आणि बायोलॉजिकल बिलीफ इन्फॉर्मेशन इनरिचमेंट मेकॅनिझम तसेच बायो इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग मॅकेनिझम या गोष्टी दुर्लक्षित केल्यामुळे जगाच्या तुलनेत भारतीयांची शारीरिक क्षमता आणि त्यांची ठेवण दुय्यम दर्जाची राहिली.

यामुळे भारतीय लोक जगाच्या तुलनेत मागे आहेत. याचे प्रमुख कारण जातीसंहिता चुकीच्या पध्दतीने लादून देशात आर्थिक, सामाजिक आणि राजकीय विषमता पोसली गेली असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला.

तर जातीय विषमता नष्ट करण्यासाठी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन करण्यात आले.

अ‍ॅड. कारभारी गवळी म्हणाले की, स्वातंत्र्याचे 74 वर्षानंतर सुद्धा आज भारतातील जातिव्यवस्थेमुळे समाजाला राष्ट्रांगवायू झाला आहे. उन्नतचेतने अभावी देशाचा विकास खुंटला आहे.

कोरोना महामारीत देशात हजारो लोक मरत असताना सरकारी यंत्रणा कुचकामी ठरत आहे. तर अनेक रुग्णालये सर्वसामान्यांना लुटत आहे.

महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणीवर नव्या भारताची उभारणी केल्याशिवाय देशाला जगाच्या स्पर्धेत टिकता येणार नसल्याची भावना व्यक्त केली.

अशोक सब्बन यांनी महात्मा फुले व बाबासाहेब यांना भारतीयांनी दीपस्तंभ स्वरूपात स्वीकारून घराघरात उन्नतचेतनेसाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नियमांचे पालन करुन ऑनलाईन मानवंदनेचा कार्यक्रम घेण्यात आला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe