पोलिस कर्मचार्‍यानेच केला चक्क जप्त मुद्देमालाचा अपहार!

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :- एका पोलीस कर्मचार्‍याने गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल फायनान्स बँकेत तारण ठेऊन त्यावर कर्ज काढले. तसेच पाच लाख ४६ हजार ६४० रूपये स्वत:च्या फायद्यासाठी खर्च केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

नगर तालुका पोलीस ठाण्यात नेमणूकीस असलेला पोलीस नाईक गणेश नामदेव शिंदे असे या पोलीस कर्मचार्‍याचे नाव आहे. त्याच्याविरोधात तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी दिलेल्या फिर्यादिवरुन भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशो की, नगर तालुका पोलीस ठाण्यात नियुक्‍तीस असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याकडे पोलीस ठाण्यात विविध गुन्ह्यात हस्तगत करण्यात आलेल्या मुद्देमालाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.

त्याने त्याच्या जवळअसलेल्या मुद्देमालातील सोन्याचे दागिने हे स्वतःचे मालकीचे नसताना फायनान्स कंपनीत तारण ठेवून त्यावर कर्ज काढून तसेच रोख रकम ५ लाख ४६ हजार ६४० रुपये स्वतःचे फायद्यासाठी खर्च करुन न्यायालयाचा विश्वासघात करुन अपहार केला आहे.

ही बाब उघड झाल्यानंतर याबाबत नगर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात कर्मचाऱ्याविरोधात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मात्र आरोपी कर्मचाऱ्याची प्रकृती अचानक बिघडल्याने पुढील मुद्देमालाची तपासणी करता आली नाही.

त्यामुळे नमूद रकमेनंतरही अजून काही रकमेचा अपहार केलेला आहे का? त्याची तपासणी करणे बाकी आहे. सपोनि शिशिर कुमार देशमुख हे पुढील तपास करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News