अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- दहावीचा निकाल लागूनही अकरावी प्रवेशासाठी ताटकळत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी अखेर शुक्रवारी जाहीर होणार आहे. पहिल्या गुणवत्ता यादीत भाग एक आणि भाग दोन अशा प्रकारचे अर्ज विद्यार्थ्यांनी 22 ऑगस्टपर्यंत भरले होते.
ज्यांनी पूर्ण अर्ज भरले अशा विद्यार्थ्यांची दहावीत मिळालेल्या मार्क्सच्या आधारे गुणवत्ता यादी उद्या जाहीर होईल. यादी जाहीर झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळतील अशा विद्यार्थ्यांना 30 ऑगस्टपर्यंत आपले प्रवेश निश्चित करायचे आहेत.
पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर पहिला पसंतीक्रम मिळाला असल्यास विद्यार्थ्याला प्रवेश घेणे बंधनकारक आहे. जर प्रथम पसंतीक्रम मिळूनही प्रवेश घेतला नाही अथवा नाकारला तर अशा विद्यार्थ्यांना पुढील नियमित फेऱ्यांमध्ये संधी दिली जाणार नाही. त्यांना विशेष फेरीपर्यंत थांबावे लागेल असे स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच प्रवेश घेऊन एखाद्या विद्यार्थ्याला प्रवेश रद्द करायचा असल्यास त्या विद्यार्थ्याला महाविद्यालयाच्या परवानगीने रद्द करता येईल. मात्र त्याला पुढील फेऱ्यांसाठी प्रवेश बंद होणार असून त्याला ही विशेष फेरीसाठी थांबावे लागणार आहे. शिक्षण संचालनालयाकडून मुंबई महानगर क्षेत्र, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर या महापालिका क्षेत्रांसाठी अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
पहिल्या फेरीसाठी या पाच विभागांतून एकूण ३ लाख ७५ हजार ३५१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामधील ३ लाख ६ हजार १११ विद्यार्थ्यांची पहिल्या फेरीसाठी अर्ज स्वीकृती झाली आहे. वरील पाच विभागात एकूण ५ लाख २८ हजार ६०० जागा उपलब्ध आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम