अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- महाराष्ट्रात दीड वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून बंद असलेल्या शाळा, महाविद्यालय सुरु होण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने श्री विशाल गणपती मंदिरासमोर आक्रोश घंटानाद करुन, गणपतीला शाळा, महाविद्यालय सुरु होण्याचे साकडे घालण्यात आले.
तर संबळाच्या निनादात शैक्षणिक पालकशाही अभियानाचे प्रारंभ करण्यात आले. या आंदोलनात अॅड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, प्रा.सुभाष कडलग, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, अशोक भोसले, जसवंतसिंग परदेशी, अशोक डाके, पोपट साठे, सुनिल टाक, कैलास पठारे, बाळासाहेब पालवे, रईस शेख, विठ्ठल सुरम, राम धोत्रे, साहेबराव पाचारणे, वीरबहादूर प्रजापती, पोपट भोसले, ज्ञानदेव चांदणे आदी सहभागी झाले होते.
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. शालेय विद्यार्थिनीच्या हस्ते घंटानाद करण्यात आला. शाहीर व कलाकारांनी संबळ व डफवर थाप मारीत एकच निनाद केला. कार्यकर्त्यांनी शाळा, महाविद्यालये उघडण्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली.
गणपतीच्या दर्शनास आलेले भाविकांनी देखील या आंदोलनात सहभाग नोंदवला. दीड वर्षापासून शाळा, महाविद्यालये बंद असल्याने एक पिढी बर्बाद होण्याच्या मार्गावर असल्याचा आरोप संघटनांच्या वतीने करण्यात आला. अनेक शिक्षण तज्ञांनी महाराष्ट्रात शाळा बंद असल्याने लहान मुले व युवकांवर विपरीत परिणाम होऊन ते हिंसक व चुकीच्या पध्दतीने वागत असल्याचे अभ्यासाने निष्कर्ष काढले आहेत.
कोरोनाचा बागुलबुवा करुन अधिक काळ शाळा, महाविद्यालये बंद ठेवता येऊ शकत नाही. त्यासाठी नियोजन करण्याची गरज आहे. शैक्षणिक पालकशाही अभियानाद्वारे प्रत्येक विद्यार्थ्यांना पालकांनी सकाळ, संध्याकाळी उकडलेले अंडी, दुध देऊन दररोज योग, प्राणायामाचे धडे देऊन त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याची सरकारकडे मागणी करण्यात आली आहे.
अॅड. कारभारी गवळी म्हणाले की, सरकारने फक्त फतवे काढून शाळा, महाविद्यालये बंद ठेवणे चुकीचे आहे. कोरोनाचा बागुलबुवाकरुन शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आले असून, ऑनलाईन शिक्षण मुलांसाठी निकामी आहे. कोरोना काळात सरकारचे शाळा, महाविद्यालयाबद्दल उचित धोरण नसल्याने भावी पिढीचे मोठे नुकसान होत आहे.
कोरोनाची तिसरी, चौथी लाटची भिती न दाखवता मुलांच्या सदृढ आरोग्यासाठी काळजी घेऊन व नियमांचे पालन करुन शाळा सुरु करण्याची गरज आहे. अन्यथा अन्यथा एक पिढी बर्बाद झाल्याशिवाय राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले. अशोक सब्बन म्हणाले की, नवीन पिढी भविष्यात शाळाच विसरुन चाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचे योग्य नियमन करुन शाळा, महाविद्यालये सुरु करण्याची आवश्यकता आहे.
ऑनलाईन शिक्षणासाठी सर्वसामान्य कुटुंबियांकडे साधने उपलब्ध नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मुलांनी एकत्र येऊन शाळेत प्रत्यक्ष शिक्षण घेतल्यास त्यांचा सर्वांगीन विकास साधला जाणार आहे. यामुळे सरकारने तातडीने शाळा, महाविद्यालये सुरु करावी.
त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मुलांना सकस आहार शासनामार्फत देऊन त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम