मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी मीडियाशी संवाद साधताना भोंग्यांच्या मुद्द्यावरून मनसे (Mns) व भाजपचा (Bjp) समाचार घेतला आहे. यावेळी त्यांनी भोंगा हा फक्त दंगल (riot) माजविण्यासाठी निर्माण झालेला आहे, असे म्हटले आहे.
तसेच भोंग्याच्या मागून कोण बोलतंय, हे सर्वांना कळतंय त्यामुळे या विषयाला अधिक महत्त्व न देता नोकऱ्या किती गेल्या याचे मोजमाप आहे का? याकडे लक्ष द्या, असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
आव्हाड म्हणाले, समाज व धर्म कोणताही असो सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) सुप्रीम आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश सर्वांना ऐकावेच लागतील. आता लोकांनीच समजून घ्यायला हवे. उद्या घराच्याबाहेर सामान्य लोकांची मुलं जाणार आहेत.
धर्म कोणताही असो पण दगडाला दगड लागून त्यातून अग्नी निर्माण होतो. त्या अग्नीत कोणत्याही नेत्याचं मुल जळणार नाही, पण तुरुंगात (Jail) मात्र सामान्य माणसाची मुलं खितपत पडतील. या देशातील तरुणांना दंगलीच्या वाटेवर नेऊन सामान्य माणसांना देशोधडीला लावायचे हा प्रकार मला तरी अमान्य असल्याचे आव्हाड यावेळी म्हणाले आहेत.
त्याचसोबत जितेंद्र आव्हाड यांनी महागाईवरूनही केंद्र सरकारवर (central government) निशाणा साधला आहे. महागाई किती वाढलीये याबद्दल कुणी बोलत नाही. पेट्रोलचे दर १२५ रुपयांवर गेलेत. त्याबद्दल कुणी बोलत नाही.
२०१४ रोजी पेट्रोलचा दर ७१ रुपये होता. त्यावेळी ४१० रुपयांना मिळणारा गॅस सिलेंडर (Gas cylinder) आज हजाराच्यावर आहे. पेट्रोल-डिझेल-सीएनजी महाग झाल्यामुळे दळणवळण महाग होतं, त्यामुळे भाजीपाला, अन्नधान्याच्या किंमती वाढतात, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.