अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- गेले सलग काही दिवस दिवस जिल्ह्यात २० हजारांपेक्षा जास्त चाचण्या दररोज होत आहेत. आगामी काही दिवस याच पद्धतीने चाचण्या करुन बाधितांचा शोध घ्या आणि कोरोना संसर्ग साखळी तोडा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी तालुकास्तरीय यंत्रणांना दिल्या आहेत.
जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येत घट दिसून येत असली तरी यंत्रणांनी अधिक व्यापक स्वरुपात चाचण्यांची गती वाढवावी. नागरिकांनीही कोविड सुसंगत वर्तणुकीचा अवलंब करुन संसर्ग पसरणार नाही, याची दक्षता घ्यावी आणि आपला जिल्हा कोरोनापासून सुरुक्षित राहील,
यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. जिल्हाधिकारी डॉ. भोसले दैनंदिनरित्या तालुकास्तरीय यंत्रणांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधून कोरोना उपाययोजना आणि त्याबाबत तालुकास्तरीय यंत्रणांना येणाऱ्या अडचणी, करावयाची कार्यवाही आदींबाबत आढावा घेत आहेत.
आज दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, नोडल अधिकारी उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोले, उर्मिला पाटील, पल्लवी निर्मळ,
जयश्री आव्हाड, रोहिणी नऱ्हे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनिल पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके हे जिल्हा मुख्यालय तर उपविभाग, तालुका स्तरावरील महसूल,
पोलीस, ग्रामविकास, आरोग्य आणि नगरविकास विभागाचे अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. जिल्ह्यात बाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून घट दिसून येत असली तरी संसर्गाची साखळी तुटलेली नाही.
त्यातच सार्वजनिक ठिकाणी कोरोना सुसंगत वर्तणुकीचा अवलंब नागरिकांकडून होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशा ठिकाणी संबंधितांवर कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी तालुकास्तरीय यंत्रणांना दिल्या. कोणत्याही परिस्थितीत संसर्ग वाढणार नाही, याची दक्षता घ्यावी.
महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत तसेच ग्रामपंचायतींनी याबाबत नागरिकांना नियम पाळण्याबाबत आवाहन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. बाधित रुग्णाच्या संपर्कातील अधिकाधिक व्यक्तींच्या चाचण्या करा. जिल्ह्यात आपण हिवरेबाजार पॅटर्नचा अवलंब करीत आहोत.
प्रत्येक गावांनी त्यादृष्टीने कार्यवाही करावयाची आहे. आपले गाव कोरोनामुक्त राहील, यासाठी करावयाच्या उपाययोजना अधिक गांभीर्याने होतील, हे पाहावे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवक यांचा सहभाग असेल,
यासाठी तालुकास्तरीय यंत्रणांनीही संबंधित गावांना सूचना द्याव्यात, असे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात १४ ठिकाणी ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभारणी करण्यात येणार आहेत. ते काम तातडीने सुरु होईल, त्यासाठीची शेड उभारणी व अन्य कामांना तात्काळ सुरुवात करावी.
याचबरोबर संबंधित तालुक्यातील मोठे व्यापारी, उद्योजक यांनाही ऑक्सीजन कॉन्स्ट्रेटर खरेदी करण्याबाबत आवाहन करावे, संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने ते उपयुक्त ठरेल, या लाटेत लहान मुलांना संसर्गाची भीती व्यक्त केली जात आहे.
त्यापार्श्वभूमीवर आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्ये कमतरता राहणार नाही, याची काळजी घ्या. प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात लहान मुलांसाठी किमान पाच बेडसचा सुसज्ज वॉर्डस तयार करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम