अहमदनगर – नाशिक-संगमनेर- पुणे हायस्पीड रेल्वेमार्गासाठी केंद्र सरकारने प्रस्तावास मान्यता दिली आहे. या प्रकल्पामुळे नाशिक-पुणे-अहमदनगर जिल्ह्यांच्या विकासाला चालना मिळेल.
हा प्रकल्प सुरू करण्यासाठी सर्व मान्यता मिळाल्या आहे. यातच भूसंपादनाबाबत देखील एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
पुणे-संगमनेर-नाशिक द्रुतगती रेल्वे मार्गाच्या भूसंपादनासाठी पुणे जिल्ह्यातील आवश्यक असणार्या जागा थेट खरेदीने संपादित करण्याच्या पुणे जिल्हाधिकार्यांच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मान्यता दिल्याने आता जागा थेट खरेदी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या प्रकल्पांतर्गत दोन मार्ग तयार करण्यात येणार असून पुणे-नाशिक अंतर दोन तासांवर येणार आहे. प्रकल्पाला होणारा विरोध लक्षात घेऊन थेट खरेदीने भूसंपादन करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने तयार केला होता. भूसंपादनासाठी आवश्यक 1200 ते 1500 कोटी रुपयांच्या निधीची मागणी जिल्हा प्रशासनाने रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. रेल्वे प्रशासनाकडून निधी मिळाल्यानंतर भूसंपादनाला सुरुवात करण्यात येणार आहे.
पुणे-संगमनेर- नाशिक द्रुतगती रेल्वे मार्गासाठी पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील 1470 हेक्टर जमिनीपैकी पुणे जिल्ह्यातील हवेली, खेड, आंबेगाव आणि जुन्नर या तालुक्यांमधील 575 हेक्टर जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे. ही प्रक्रिया सुरू करण्याचे आदेशही प्राप्त झाले असून त्याबाबतची कार्यवाही सुरू झाली आहे.
दरम्यान पुणे-नाशिक द्रुतगती रेल्वेचा वेग प्रतितास 200 कि.मी. इतका असणार आहे. या मार्गावर 18 बोगदे, 41 उड्डाण पूल आणि 128 भुयारी मार्ग असणार आहेत.