बिबट्या फिरतोय खुलेआम त्याच्या भीतीने नागरिक झाले बंदिस्त

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- बेसुमार वृक्षतोड, भक्ष्य व पाण्याचा अभाव यामुळे वन्यप्राणी मानवी वस्त्यांकडे धाव घेऊ लागले आहेत. मात्र, लपायला जागा नसल्यामुळे तसेच भक्ष्य मिळविण्यासाठी बिबट्या माणसांवर हल्ले करू लागला आहे.

यातच आता त्यांचा मानवीवस्तीकडे मुक्तसंचार पाहून नागरिकांमध्ये भिती पसरली आहे. सध्या बिबट्या पिंजऱ्याबाहेर आणि नागरिक घरातच झाले कैद अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. श्रीरामपूर शहरातील सुर्यनगर, पाटणी मळा परिसरात नागरिकांना बिबट्याने दर्शन दिले.

दोन दिवसांपुर्वी बिबट्याच्या हल्ल्यात एक हरिण मृतावस्थेत आढळून आले होते. त्यानंतर शुक्रवारी रात्री पुन्हा या भागात बिबट्याने दर्शन दिल्याने शहरात खळबळ उडाली आहे. सूर्यनगर भागात दोन दिवसांपुर्वी हरिण मृतावस्थेत आढळून आले होते.

शुक्रवारी रात्री याच भागात काही नागरिकांना बिबट्या दिसला. ही वार्ता वार्‍यासारखी शहरात पसरली. काहींनी वन विभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला. परंतु रात्र आहे, उद्या पाहू, असे त्यांना सांगण्यात आले.

या भागात मोठ्या प्रमाणात काटवन असल्याने बिबट्या या काटवनात लपला असावा, रात्री काही अनुचित घडल्यास त्यास जबाबदार कोण, अशी चर्चा नागरिक करीत आहेत.

या भागातील लोक इमारतीच्या गच्चीवरून बिबट्याला पहात होते. बिबट्याचा मुक्तसंचार पाहता नागरिकांची घराबाहेर पडण्याची हिम्मत होत नव्हती. यामुळे सध्या बिबट्या बाहेर आणि नागरिक घरामध्येच झाली बंदिस्त अशी परिस्थिती पाहायला मिळते आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!