अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-दुचाकीहून आलेल्या दोघा भामट्यांनी अंगणात रांगोळी काढत असलेल्या एका सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेच्या गळ्यातील सव्वा तोळ्याचे मंगळसूत्र ओरबाडले.
ही घटना शुक्रवारी सकाळी सव्वा सातच्या सुमारास संगमनेर शहरातील अभिनव नगर येथे घडली. या परिसरातीलच एका घराबाहेर असलेल्या सीसीटिव्हीत संबंधित भामटे कैद झाले आहेत.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2021/02/Chain-Snatching.jpg)
येथील अभिनव नगरमध्ये अरूंधती विजय रेंघे या कुटुंबासमवेत तेथे राहतात. सेवानिवृत्त मुख्याध्यापिका असलेल्या रेंघे या सकाळी सव्वा सातच्या सुमारास अंगणात रांगोळी काढत होत्या.
रांगोळी काढून झाल्यानंतर त्या घरात जात असताना दुचाकीहून आलेल्या दोघा चोरट्यांपैकी मागे बसलेल्याने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडत त्यांना जोराचा धक्का दिला. त्यानंतर हे चोरटे नवीन नगर रस्त्याकडे गेले.
काही क्षणात हा प्रकार घडल्याने रेंघे गोंधळून गेल्या. त्यांच्या मानेला जखम झाली आहे. रेंघे यांची मुलगी ॲड. मृदुला बंदिष्टे यांनी शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख यांना घडला प्रकार कळविला.
त्यानंतर देशमुख यांनी घटनास्थळाला भेट दिली. चोरटे कैद झालेले सीसीटिव्हीतील फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved