जिल्हा बँक निवडणूक : भाजपच्या असंतुष्ट नेत्यांच्या मदतीने विखेंना दूर ठेवण्यात यश !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:-राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर बदलत्या राजकीय परिस्थितीत नगरच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक राज्यस्तरावर गाजली .

नगरच्या जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक झाली. २१ पैकी १७ जागा बिनविरोध झाल्या. चार जागांसाठी निवडणूक घ्यावी लागली. त्यांचे निकाल आज जाहीर झाले.

त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस ९, भाजप ७, काँग्रेस ४ आणि शिवसेना १ असे उमेदवार निवडून आले आहेत. यामध्ये भाजपचे सात दिसत असले तरी त्यातील विखे यांच्या सोबत असलेले केवळ दोघेच आहेत.

थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या चौघांना यश आले आहे. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या रुपाने शिवसेनेचा जिल्हा बँकेत प्रवेश झाला आहे. बिनविरोध होऊ न शकलेली पारनेरमधील एक जागा चांगलीच प्रतिष्ठेची झाली होती.

तेथे दत्ता पानसरे यांच्यासाठी विखेंनी जोर लावला होता. खासदार डॉ. सुजय विखे पाटील स्वत: पारनेरमध्ये तळ ठोकून होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांना उभे करण्यात आले होते.

त्यांच्यासाठी स्वत: अजित पवार मतदारांशी संपर्क ठेवून होते. अखेर या चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादीचे गायकवाड विजयी झाले. अशीच लक्षवेधक लढत नगर तालुक्यात भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्याबाबतीत झाली.

बिनविरोध निवडणूक करताना कर्डिले यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. भाजपने त्यांना निवडणूक समितीवर घेतले होते, मात्र असे असूनही त्यांनी थोरातांच्या बैठकीला हजरी लावली होती.

त्यानंतर पुढे दोन्ही बाजूंनी त्यांच्याकडे दुर्लक्षच झाल्याचे दिसले. मात्र, वर्षानुवर्षे बँकेत वर्चस्व असलेल्या कर्डिले यांनी स्वत:च्या हिमतीवर याहीवेळी निवडणूक जिंकली. ते भाजपचे असले तरी विखेंचे विरोधक मानले जातात.

नगरच्या जिल्हा बँकेत विखे विरूद्ध थोरात आणि बाकी सर्व असे राजकारण चालते. बहुतांश वेळा थोरात यशस्वी होतात. यावेळीही त्यांनी पवार आणि भाजपच्या असंतुष्ट नेत्यांच्या मदतीने विखेंना दूर ठेवण्यात यश मिळविले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe