अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-राज्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता टाळेबंदी की कठोर निर्बंध यावर बरेच दिवस खल सुरू होता.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांशी चर्चा करीत त्यांची मते जाणून घेतली होती. रविवारी दुपारी झालेल्या तातडीच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सलून बंद राज्यात लागू केलेल्या नव्या निर्बंधानुसार मनोरंजन व करमणुकीची स्थळे बंद राहणार आहेत. तसेच चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे, व्हिडिओ पार्लर, क्लब, जलतरण तलाव, क्रीडा संकुले, सभागृहे, वॉटर पार्क हे देखील पूर्णपणे बंद राहणार आहेत.
सर्व कटिंग सलून्स, ब्युटी पार्लर्स, स्पा बंद राहतील. प्रार्थना स्थळे दर्शनासाठी बंद राज्यात सर्वधर्मीयांची स्थळे, प्रार्थना स्थळे बाहेरून येणारे भक्त आणि दर्शनार्थीसाठी बंद राहणार आहे. मात्र याठिकाणी काम करणारे कर्मचारी आणि पुजारी येथे दैनंदिन पूजा अर्चा करु शकतील.
या कर्मचाऱ्यांचे लसीकरण देखील लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याच्या सूचना सरकारने केल्या आहेत. हॉटेल आणि बार बंद राज्यातील उपाहारगृहे तसेच बार पूर्णतः बंद राहणार आहेत.
पण उपाहारगृह एखाद्या हॉटेलचा भाग असेल तर ते तेथे राहणाऱ्या अभ्यागातासाठीच सुरू ठेवता येईल, पण बाहेरील व्यक्तीसाठी प्रवेश असणार नाही. मात्र टेक अवे किंवा पार्सलची सेवा सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरू ठेवता येणार आहे.
रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दिवसा सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत जमावबंदी लागू असेल. या काळात पाच किं वा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. राज्यात १४४ कलम लागू करण्यात आले आहे.
एप्रिल महिन्यात उर्वरित तीन शनिवार व रविवार असे दोन दिवस संपूर्ण संचारबंदी लागू असेल. हे निर्बंध शुक्र वारी रात्री ८ वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी ७ पर्यंत लागू असतील.
संचारबंदीच्या काळात सबळ कारण अथवा प्रशासनाच्या परवानगीशिवाय कोणालाही बाहेर फिरता येणार नाही. अत्यावश्यक सेवा, आरोग्य, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे, वस्तूंची वाहतूक करणारे, अधिस्वीकृतीधारक पत्रकार, ई-कॉमर्स,शेतीशी संबंधित कामे, पालिके शी संबंधित कर्मचारी यांना या र्निबधातून वगळण्यात आले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|