Ahmednagar MIDC News : अहमदनगर जिल्ह्यात कर्जत औद्योगिक वसाहत निर्माण व्हावी यासाठी आ. रोहित पवारांनी प्रयत्न केले होते. तसेच आ. राम शिंदे यांनीही पाठपुरावा केल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान आता हा एमआयडीसी प्रस्ताव श्रेयवादाच्या लढाईत पुन्हा राखडेल असे वाटतं आहे. याचे कारण असे आ. रोहित पवार यांनी सुचवलेल्या जागेऐवजी आता दुसऱ्याच जागेसाठी कर्जत एमआयडीसीच्या जागेचा पुन्हा फेरप्रस्ताव पाठवला आहे.

बैठकीला आ. रोहित पवार यांना आमंत्रणच नाही
आमदार प्रा.राम शिंदे यांनी मंगळवारी नागपूरच्या विधानभवनात कर्जतच्या एमआयडीसी संदर्भात बैठक बोलावली होती. या बैठकीला निमंत्रण न दिल्याने रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
तसेच राजकीय दबावापोटी दुजाभाव उद्योग मंत्री सामंत यांनी केल्याचा आरोप त्यांनी केला. मंगळवारी आ. प्रा. शिंदे यांनी कर्जत एमआयडीसी निर्मितीबाबत मंत्री उदय सामंत यांच्या दालनात बैठक घेतली.
यात आ. पवारांना बोलावले नाही.याबाबत नाराजी व्यक्त करत एमआयडीसीसाठी कायदेशीर प्रक्रिया मी पूर्ण करून घेतली, संबंधित फईलवर केवळ अंतिम स्वाक्षरी बाकी आहे असे पवार यांनी म्हटले.
आ. पवारांचा पाठपुरावा
कर्जत येथील येथील पाटेगाव व जामखेड येथील खंडाळा येथील एमआयडीसी मंजुरीसाठी आ. रोहित पवार यांनी २७ डिसेंबर २०२२ ला हा विधान मंडळाच्या कामकाजात लक्षवेधीद्वारे विषय मांडला होता.
त्यावेळी जानेवारी २०२३ मध्ये सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून शासनाच्या मध्यस्थीने तेथे उद्योग आणले जातील असे आश्वासन दिले होते. परंतु याची पूर्तता न झाल्याने जुलै महिन्यात झालेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार रोहित पवार यांनी उपोषणही केले होते.
एमआयडीसीची जागा बदलणार
सध्या जी जागा निर्धारित केली होती ती आता रद्द करून दुसऱ्या जागेचा फेरप्रस्ताव पाठवण्यात आला आहे. देश सोडून पळून गेलेल्या निरव मोदीची जमीन वा प्रस्तावित एमआयडीसीत असल्यामुळे पाटेगाव ग्रामपंचायतने त्याला विरोध केला असल्याचे सांगितले जात आहे.
त्यामुळे हा प्रस्ताव उद्योग मंत्री सामंत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत रद्द केला गेला. कर्जत तालुक्यातील इतर जमिन नियम, अटी शर्तीला धरून एमआयडीसीसाठी लागणाऱ्या जमिनीच्या परिपूर्ण प्रस्ताव १५ दिवसांच्या आत शासनाला सादर करावा असे निर्देशही यावेळी सामंत यांनी दिले.