अहमदनगर Live24 टीम, 12 ऑगस्ट 2021 :- बीएचएमएस अभ्यासक्रमाच्या एका विद्यार्थिनीला पदवी प्रमाणपत्र आणि इंटर्नशीप केल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी सुमारे दीड लाखांची लाच स्वीकारताना वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य आणि लिपिकाला अटक करण्यात आली.
या प्रकरणी औरंगाबाद जिल्ह्यातील गांगापूरच्या एका विद्यार्थीनीच्या पालकांनी तक्रार दिली आहे. त्यावरून नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने गुरुवारी दुपारी सापळा रचून ही कारवाई केली. याप्रकरणी प्रभारी प्राचार्य बापूसाहेब बाळासाहेब हरिश्चंद्रे व लिपिक भारती बापूसाहेब इथापे यांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान हा धक्कादायक प्रकार वडाळा महादेव (ता. श्रीरामपूर) येथील शिवा ट्रस्ट संचलित शरदचंद्रजी पवार होमिओपॅथीक होमिओपॅथी मेडीकल कॉलेजमध्ये ही घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, गंगापूरच्या या विद्यार्थिनीने या वैद्यकीय महाविद्यालयात बीएचएमएसचे शिक्षण घेतले.
तिचे उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, इंटर्नशीप पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देणे, या कालावधीतील गैरहजेरीची अडजेस्टमेंट करणे यासाठी लाच मागण्यात आली होती. एक लाख ४७ हजार ५०० रुपयांची लाच मागण्यात आली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक शाम पवरे यांनी पंचासमक्ष जाऊन पडताळणी केली.
तेव्हा प्राचार्य हरिश्चंद्रे यांच्या सांगण्यावरून लिपिक इथापे यांनी लाचेची मागणी केली. पडताळणी झाल्यानंतर सापळा रचण्यात आला आणि आरोपींना पकडण्यात आले. प्रभारी प्रचार्य बापूसाहेब बाळासाहेब हरिश्चंद्रे (५२ रा. मानूर, ता-राहुरी) व लिपिक भारती बापूसाहेब इथापे (वय ३४ रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपूर) यांना पकडण्यात आले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम