शेवगाव तालुक्यातील त्या रस्त्याची तातडीने करण्यात आली दुरुस्ती

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- पाथर्डी ते अमरापूर दरम्यानच्या १३ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. तोच शेवगाव तालुक्यातील अमरापूर तर पाथर्डी तालुक्यातील खेर्डा फाट्याजवळ अवघ्या काही दिवसात रस्ता उखडला होता.

मात्र याच मुद्द्यावरून चर्चा सुरु झाल्याने संबंधित ठेकेदाराने तातडीने ते खड्डे बुजविले आणि या प्रकरणावर पडदा टाकला .

कोट्यवधी रुपये खर्च करून नव्याने साकारण्यात आलेल्या बारामती ते अमरापूर राज्यमार्ग क्र.५४ चे हरकती असलेल्या काही ठिकाणचा अपवाद वगळता, अन्य रस्त्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. चकाचक दिसणाऱ्या या मार्गावरून दुचाकी, चारचाकी वाहने सुसाट वेगाने धावू लागली आहेत.

त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर झाला आहे. या मार्गावर गाव तिथे लक्षवेधी बसथांबेही उभारण्यात आले आहेत.

तसेच ठिकठिकाणी सूचना व दिशादर्शक फलक बसविण्यात आले आहेत. मात्र अवघ्या काही दिवसांपूर्वी पूर्ण झालेल्या या मार्गावर शेवगाव तालुक्यातील अमरापूर ते काळेवाडी तर पाथर्डी तालुक्यातील डांगेवाडी ते खेर्डा फाटा दरम्यान काही ठिकाणी रस्ता उखडला आहे.

काही ठिकाणी डागडुजी करण्यात आल्याचे दिसते. अचानक समोर दिसणारा खड्डा चुकविताना वाहनांना अपघात होण्याचा धोका वाढला होता.

दरम्यान संबंधित ठेकेदाराने ‘ते’ खड्डे बुजविले आहेत. दरम्यान आगामी काळात अमरापूर ते औरंगाबाद दरम्यानच्या रस्त्याचे काम होऊन बारामती व औरंगाबादला जोडणारा राज्यमार्ग,

भिगवण, कर्जत, पाथर्डी, शेवगाव, पैठण आदी शहरांच्या विकासात भर घालणारा ठरणार आहे. तसेच या मार्गावर येणाऱ्या शहरासाठी व गावांसाठी वरदान ठरत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe