पावसाळ्यापूर्वीच राहाता शहरातील रस्त्यांची झालीये दुरावस्था

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये आजही रस्त्यांची दुर्दशा झालेली पाहायला मिळते आहे. दरम्यान अद्याप पावसाळा सुरु देखील झाला

नाही तोच अशी परिस्थिती असल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी संतापाची लाट उसळली आहे.

असाच जनउद्रेक राहाता तालुक्यात पाहायला मिळाला आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे राहाता शहरात पावसाळ्याच्या सुरुवातीलाच अनेक भागातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने नागरिकांना जाण्या-येण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

पालिका प्रशासनाने तात्काळ संबंधित ठेकेदाराला भूमिगत गटार योजनेसाठी खोदलेला रस्ता दुरुस्त करण्यासाठी सूचना कराव्यात, अशी मागणी राहाता शहरातील नागरिकांकडून केली जात आहे.

गेल्या चार वर्षांपासून राहाता शहरात 24 कोटी रुपये खर्चाची भूमिगत गटार योजनेचे काम सुरू असून सदर कामाचा ठेका पुणे येथील कंपनीने घेतला आहे. जवळपास राहाता नगरपालिका सर्वच प्रभागांत 70 टक्के भूमिगत गटार योजनेचे काम पूर्ण झाले आहे.

ही योजना पूर्ण करण्यासाठी अनेक ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला नागरिकांची घरे असल्यामुळे पर्याय नाही म्हणून संबंधित ठेकेदाराने रस्ता फोडून रस्त्याच्या मध्यभागी सिमेंट पाईप टाकून भूमिगत गटार योजना काम पूर्ण केले.

परंतु काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराने खोदलेला रस्ता खडीकरण व डांबरीकरण न करता त्याठिकाणी मुरूम टाकण्यात आला. त्यामुळे मुरूम खचून खड्डे निर्माण झाले आहे.

तसेच शहरातील अनेक मुख्य व उपनगरातील रस्ते यांना पावसाळ्यातील पाणी वाहून जाण्यासाठी रस्त्याच्या बाजूला नालीची व्यवस्था किंवा रस्त्याच्या कडेला असलेल्या

भूमिगत गटारीमध्ये पाणी वाहून जाण्याची व्यवस्था नसल्यामुळे रोडवर पाणी साचून मोठे खड्डे निर्माण होऊन रोडची वाईट दुर्दशा होत आहे.

राहाता नगरपालिका प्रशासनाने तात्काळ ठेकेदाराला समज देऊन भूमिगत गटार योजनेसाठी खोदलेले रस्ते दुरुस्ती करून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी ही शहरातील नागरिकांची अपेक्षा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe