अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- राज्यात सगळीकडे शाळा अद्याप बंद असताना मात्र अहमदनगर जिल्ह्यातील आदर्शगाव म्हणून प्रसिद्ध असलेले हिवरेबाजारमध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शाळा सुरु करण्यात आली आहे.
हिवरेबाजारच्या ग्रामसभेने निर्णय घेत आपल्या गावातील पाचवी ते दहावीचे वर्ग प्रत्यक्ष नियमितपणे भरवायला सुरुवात केली आहे. सध्याच्या स्थितीला शाळेत पाचवी ते दहावीचे मिळून एकूण २९४ विद्यार्थी उपस्थितीत असतात. तर पहिलीचे वर्गही सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान हिवरेबाजारने शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाकडे अधिकृत परवानगी मागितली होती. मात्र, शिक्षण विभागाने काहीही अभिप्राय दिला नाही. पालकांनी स्वत:च्या जबाबदारीवर मुले शाळेत पाठविण्याची तयारी दर्शविली असल्याचे हिवरेबाजारचे उपसरपंच पोपटराव पवार यांनी सांगितले.
दरम्यान राज्यात सगळीकडे शाळा अद्याप बंद असताना कोरोनामुक्त हिवरेबाजारमध्ये शाळा सुरु करण्यात आली आहे. कोरोनाचा धोका कायम असताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने घेतली जात आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची शाळेत नियमित आरोग्य तपासणी होते.
सुरक्षित अंतर ठेवून बसविले जाते, तसेच सकाळी १० ते १ या वेळेत वर्ग भरतात मुले एकत्र येऊ नये म्हणून मुलांना जेवणाचे डब्बे घेऊन येण्यास परवनगी नाही. मैदानावर खेळण्यास परवानगी नाही, तसेच विद्यार्थ्यानी शाळा सुटली की घरी जायचे अशा काही सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे.
याबाबत उपसरपंच पोपटराव पवार म्हणाले, शासनाची परवानगी नसली तरी हिवरेबाजारने स्वत:च्या जोखमीवर शाळा सुरू केली आहे. कुठल्या मुलाला त्रास झाला तर आजारपणाचा त्रास गावाला उचलावा लागणार आहे.’
तसेच शाळा सुरु झाल्याने शिक्षकांनीही गावाबाहेर न जाता त्यांना कोरोना काळात गावातच राहण्याचे आवाहन गावकरी करणार आहेत. या शिक्षकांना योग्य त्या सुविधा पुरविण्याची ग्वाही ग्रामस्थांनी दिली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम