बाळ बोठेला अटक होत नाही तोपर्यंत रेखा जरे हत्याकांडाचे रहस्य…

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:- बहुचर्चित रेखा जरे हत्याकांड प्रकरणाला आज (दि. २ मार्च) तीन महिने पूर्ण झाले आहे. तीन महिन्याचा कालावधी उलटूनही घटनेतील मुख्य सूत्रधार पसार बाळ बोठे याला अद्यापही अटक न झाल्याने हत्येचे गुढ कायम आहे.

पारनेरच्या न्यायालयात घटनेतील पाच आरोपींविरुद्ध नुकतेच दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. बाळ बोठे याला अटक झाल्यानंतर त्याच्या विरुद्ध पुरवणी दोषारोपपत्र दाखल होणार आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून पोलिसांना सातत्याने गुंगारा देणाऱ्या बाळ बोठेच्या अटकेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. बाळ बोठेला अटक करण्यासाठी स्व. रेखा जरे यांचे चिरंजीव ऋणाल जरे यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

नगर-पुणे रोडवरील जातेगाव घाटात रेखा जरे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. ही घटना ३० नोव्हेंबर रोजी घडली होती. या घटनेमुळे नगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडून गेली. पोलिसांनी मारेकऱ्यांसह पाच जणांना तत्काळ अटक केली मात्र हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे अद्यापही पसारच आहे.

त्याच्या अटकेसाठी पोलिस पथके कार्यारत असून पथकांनी ठिकठिकाणी छापेही टाकले. मात्र बाळ बोठे पोलिसांना चकवा देत आहे. जोपर्यंत बाळ बोठे याला अटक होत नाही तोपर्यंत रेखा जरे हत्याकांडाचे रहस्य उलगडणे शक्य होणार नाही.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe