अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:-जिल्ह्यात सध्या अनेक ठिकाणी मृतदेह सापडणे, खून, अशा गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना घडू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यातच एका अशाच जुन्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. सुमारे सहा महिन्यांपूर्वी बेपत्ता म्हणून पोलिसांत नोंद झालेल्या 45 वर्षीय व्यक्तीच्या मृतदेहाचा सांगाडा शेवगाव तालुक्यातील आखातवाडे येथील ढोरा नदीच्या पुलाखाली सापडला आहे.
बाळासाहेब शाहू कटारनवरे (वय 45, रा. आपेगाव) यांचा हा सांगाडा असल्याचे कपड्यांवरून निष्पन्न झाले. याबाबत नातेवाईकांनी सहा महिन्यांपूर्वीच बाळासाहेब बेपत्ता झाल्याची तक्रार शेवगाव पोलिस ठाण्यात दिली होती.
हा सांगाडा न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. आपेगाव येथून घरी काहीही न सांगता, 13 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी बाळासाहेब कटारनवरे निघून गेल्याची तक्रार त्यांचा मुलगा अजय कटारनवरे याने शेवगाव पोलिस ठाण्यात दिली होती.
मात्र, सहा महिन्यांपासून त्यांचा तपास लागला नव्हता. ढोरा नदीतील बंधारे पूर्ण क्षमतेने भरलेले असल्याने, पात्रात बरेच दिवस पाणी होते.
आता पाणी कमी झाल्यावर आखातवाडे येथील पुलाखालील मोर्यामध्ये काही नागरिकांना काटवनात मानवी सांगाडा दिसला.
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, तेथे कवटी व हाडाचा सापळा दिसला. त्यावर पांढरा शर्ट, निळसर पँट पाहून कटारनवरे यांच्या कुटुंबीयांना ओळख पटली.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|