अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली भेट म्हणजे राजकीय तडजोड आहे आणि या भेटीतून सत्तांतर होणार असून यातून देवाण-घेवाण होणार असल्याचा गौप्यस्फोट राज्यसभा सदस्य उदयनराजे भोसले यांनी केला आहे.
दरम्यान, खा. उदयनराजेंनी केलेल्या या राजकीय भाष्यामुळे सातारा जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, कोविड लसीकरण तुटवडा, पीक विमा, त्याचबरोबर इतर विषयांच्या अनुषंगाने मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार,

मंत्री अशोक चव्हाण, मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली आणि चर्चा केली. या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून यावर आता खा. उदयनराजेंनीही भाष्य केले आहे.
पंतप्रधान मोदी यांची मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतलेली भेट केवळ राजकीय तडजोडीसाठी झालेली असल्याचा आरोप त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
उदयनराजे म्हणाले, नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान या नात्याने भेटायला जाण्यापूर्वी उध्दव ठाकरे, तुम्ही एक अधिवेशन बोलावून चर्चा करायला हवी होती, अथवा घडवून तरी आणायला हवी होती. आता हे जाऊन भेटले आणि बोलणार तरी काय?,
ठीक आहे आम्ही असे, असे करतो. तुम्ही असे, असे करा. आपण एकत्र येऊया, अशी चर्चा होणार. नंतर देवाण-घेवाण होणार आणि सत्तांतर होणार. ही भेट म्हणजे राजकीय तडजोड आहे.’
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम