सावत्र आई- बापाने अल्पवयीन मुलीला मारहाण करत घराबाहेर काढले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- अल्पवयीन मुलीला मारहाण करून सावत्र आई- बापाने घराच्या बाहेर काढून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून सावत्र आई व वडिलाविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाइल्ड लाइनचे सदस्य प्रवीण कदम यांनीच ही फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी ललिता तिरथ दिव्यांका व तिरथ दिव्यांका (रा. तपोवन रोड) या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान चाइल्ड लाइनमुळे अल्पवयीन मुलीची सावत्र आई-वडिलांच्या ताब्यातून सुटका झाली आहे.

या अल्पवयीन मुलीला स्नेहालय संचलित केडगाव येथील स्नेहांकुर या दत्तक विधान केंद्रात तात्पुरत्या स्वरूपाचा निवारा मिळवून देण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, पाच ते सहा दिवसांपासून एक अल्पवयीन मुलगी तपोवन रोड परिसरात बेवारस अवस्थेत फिरत आहे.

तिच्या शरीराला जखमा आहेत, असा फोन चाइल्ड लाइनला आला होता. चाइल्ड लाइनचे प्रवीण कदम आणि प्रियंका गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेत अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. तिच्याकडे विचारणा केल्यानंतर तिने सावत्र आई- वडिलांकडून त्रास दिला जात असल्याचे समजले.

याबाबत कदम यांनी तोफखाना पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी उपनिरीक्षक सूरज मेढे, पोलीस कर्मचारी शिरीष तरटे, महिला कर्मचारी गहिले यांना घटनास्थळी पाठविले. चाइल्ड लाइनचे सदस्य कदम यांच्या फिर्यादीवरून मारहाण करणाऱ्या आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe