अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- येत्या 21 ऑगस्ट रोजी अकरावी प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी 20 जुलैपासून ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली. पण अर्ज करताना विद्यार्थ्यांना वेबसाईटवर अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या.
तसंच, मंगळवार आणि बुधवार या दोन्ही दिवसात बराच वेळ ही वेबसाईट बंद देखील होती. त्यामुळे विद्यार्थी त्रस्त झाले. ही बाब लक्षात घेता वेबसाईट तांत्रिक कारणासाठी बंद ठेवण्यात आली असल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.
एसएससीसह सीबीएसई, आयसीएसई व अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये समान न्याय मिळावा यासाठी सीईटी प्रवेश प्रक्रिया घेण्याचा निर्णय राज्य मंडळाकडून घेण्यात आला.
त्यानुसार 20 जुलैपासून सीईटी परीक्षेला नेंदणी करण्यासाठी वेबसाईटची लिंक उपलब्ध करून देण्यात आली. ही नोंदणी 26 जुलैपर्यंत करण्याची मुदत विद्यार्थ्यांना देण्यात आली, मात्र पहिल्या दिवसापासून सीईटीच्या लिंकला तांत्रिक अडचणीचा फटका बसला आहे.
आतापर्यंत सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांनी अर्ज भरले. आज दुसऱया दिवशी 16 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. दरम्यान, ही वेबसाईट तापूर्ती बंद आहे. सुरू होईल त्यावेळी विद्यार्थ्यांना कळविण्यात येणार आहे, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, निकालाच्यावेळीही वेब साईट हँग झाली होती. त्यामुळे निकाल पाहण्यासाठी पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला होता. आता अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना नोंदणी करता येत नाही.
तांत्रिक कारणाने ही बेबसाईट बंद असल्याचे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले. विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ दिला जाईल असेही सांगण्यात आले आहे. दरम्यान, या घोळामुळे प्रवेश लांबण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम