अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :-अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीची ऑनलाईन सर्वसाधारण सभा गोंधळाच्या वातावरणात पार पडली. लाभांश कमी दिल्याने सत्ताधार्यांचा परिवर्तन मंडळाच्या विरोधी संचालक व सभासदांनी निषेध नोंदवला.
यावेळी परिवर्तन मंडळाचे विरोधी संचालक आप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे, वसंत खेडकर, माजी संचालक अंबादास राजळे, सुनील दानवे, भाऊसाहेब जिवडे आदी उपस्थित होते. सत्ताधारी मनमानी कारभार करत असल्याने विरोधी संचालक दंडाला काळ्या फिती बांधून सभेत सहभागी झाले होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षक सोसायटीची सर्वसाधारण सभा सोमवारी दि.26 जुलै रोजी पार पडली. सभा सुरु होण्यापुर्वी परिवर्तन मंडळाच्या विरोधी संचालकांनी सत्ताधारी संचालकांच्या मनमानी कारभाराचा निषेध नोंदवून निदर्शने केली.
यावेळी संचालक सभेमध्ये मागणी करूनही सत्ताधारी संचालक मंडळाने फक्त 8 टक्के लाभांश देऊन सभासदांच्या तोंडाला पाणी पुसले. मागील तुलनेत सभासदांना पाच टक्के लाभांश कमी देऊन विश्वासघात केला असल्याचे आप्पासाहेब शिंदे यांनी म्हंटले आहे. निवडणुका आल्या की लाभांश वाढवून द्यायचा आणि निवडणुका संपल्या की लाभांश कमी करायचा, असा फसवा-फसवीचा कारभार सत्ताधारी संचालक मंडळ करत असल्याचा आरोप विरोधी संचालकांनी केला आहे.
दरवर्षी जागा खरेदी तसेच बांधकाम यावर लाख रुपये खर्च केले जातात. पुढील आर्थिक वर्षात कुठेही जागा खरेदी न करता जे सभासद मयत झाले त्या सभासदांच्या रकमा परत कराव्यात, अशी मागणी परिवर्तन मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. सभासदांचे हित लक्षात घेऊन जामीन कर्ज मर्यादा 20 लाख करावी, अशी सभासदांची मागणी आहे.
या मागणीसाठी परिवर्तन मंडळ प्रयत्नशील आहे. परंतु कोरोनाचे संकट असतानाही सभासद हिताचा विचार न करता किरकोळ खर्च, उद्घाटन खर्च, छपाई, जाहिरात खर्च दुरुस्ती खर्च आदी बाबींवर वारेमाप खर्च करून सभासदांच्या खिशाला कात्री लावण्याचे काम संचालक मंडळ करत असल्याचे विरोधी संचालकांनी स्पष्ट केले आहे. नोकर भरती, शाखा ऑनलाईन, कर्मचारी बढतीबाबत सत्ताधार्यांना विरोधकांनी धारेवर धरले होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम