अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- केवळ शब्दांची आतषबाजी करणाऱ्या ठाकरे सरकारने शेतकऱ्यांच्या फसवणुकीत आणखी एक पाऊल पुढे टाकले. अतिवृष्टी, वादळांसारख्या संकटात अगोदरच भरडलेल्या शेतकऱ्यास मदतीचा हात देण्याऐवजी स्वतःच्या जाहिरातबाजीवरच १६० कोटींची उधळपट्टी करून ठाकरे सरकारने शेतकऱ्यास उद्ध्वस्त केले, अशी टीका भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांनी केली.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी राणा भीमदेवी थाटात राज्यातील संकटग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची गर्जना विधिमंडळात केली. त्याला दीड वर्ष उलटून गेल्यानंतरही शेतकऱ्याच्या पदरात कर्जमाफी पडलीच नाही. खोट्या जाहिरातींवर १६० कोटींची उधळपट्टी करण्याऐवजी १५० कोटी रुपये कर्जमाफीला दिले असते,
तर संकटग्रस्त शेतकऱ्यास दिलासा मिळाला असता. राज्यातील शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन कर्जमुक्त करण्याची घोषणा ठाकरे यांनी केली होती. प्रत्यक्षात मात्र वीज दरवाढीचे धक्के देऊन शेतकऱ्यास वेठीस धरले आहे. पीकविम्यातही विमा कंपन्यांशी साटेलोटे करून शेतकऱ्याची फसवणूक होत आहे, असा आरोप त्यांनी केला.
राज्यातील दीड लाख शेतकरी कुटुंबांना या फसवणुकीचा फटका बसत असताना ठाकरे सरकार मात्र, पाहणी दौऱ्याच्या नावाखाली मर्सिडीझमधून पर्यटन करण्यात दंग आहे,
अशी टीकाही त्यांनी केली. कर्जबाजारी शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत लाभ देण्याची घोषणा डिसेंबर २०१९ मध्ये मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली होती. त्यावर कोणतीच कार्यवाही, तर नाहीच, उलट त्यानंतर वादळ, अतिवृष्टीसारख्या संकटामुळे समस्यांमध्ये भर पडूनही सरकारने मात्र शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम