अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाने हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. यातच जिल्ह्यातील संगमनेर, शेवगावसह पारनेर तालुक्यात कोरोनाची अधिक प्रभाव दिसून आला होता.
तसेच पारनेर तालुक्यात रुग्णसंख्या वाढल्याने पारनेर, टाकळी ढोकेश्वर, सुपा, भाळवणी, जवळा, निघोजसह ४३ गावांमध्ये १० ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले होते. आता येथील व्यवहार सुरळीत होणार आहेत.
पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढत असल्याने जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, तहसीलदार ज्योती देवरे यांनी सर्वांबरोबर चर्चा करून ३२ गावांमध्ये १० ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले होते.
मंगळवारी याची मुदत संपल्यावर बुधवारपासून व्यवहार पूर्ववत सुरू झाले होते. यामध्ये पारनेर तालुक्यात अजूनही रुग्णसंख्या वाढत आहे.
तालुक्यातील पारनेर, निघोज, वडगाव सावताळ, शिरापूर, वासुंदे, कान्हूर पठार, जवळा गाडीलगाव ही गावे अजूनही कोरोनाच्या विळख्यात असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी सांगितले.
दरम्यान नुकतेच ४३ गावांमधील लॉकडाऊन संपुष्ठात आला आहे. मात्र जिल्हा तिसऱ्या श्रेणीत असल्याने तालुक्यात दुपारी ४ वाजेपर्यंतच व्यवहार सुरू ठेवता येतील, असे प्रांताधिकारी भोसले यांनी सांगितले.
पारनेर शहरात ६ दुकाने दुपारी ४ वाजेनंतर उघडी असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, असे मुख्याधिकारी डॉ. कुमावत यांनी सांगितले. पोलिसांकडून विनामास्क फिरणाऱ्या लोकांवर कारवाई सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक बळप यांनी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम