अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:- मी शासनाचा माणूस आहे. तुमचे पैसे व माझे पैसे माझे हाताने भरतो व राजीव गांधी योजनेची तुमची फाईल तयार करुन देतो, अशी बतावणी करून साईबाबा संस्थानच्या साईनाथ हॉस्पिटलमध्ये आलेल्या रुग्ण व त्याचे नातेवाइक यांना गंडा घालणाऱ्या भामटयास शिर्डी पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत शिर्डी पोलिस स्टेशनचे पो. नि. प्रवीण लोखंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार दि.११ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वा. चे सुमारास शिवाजी राजगुर रा. रुई ता.अंबङ जि.जालना हे त्यांचे नातेवाईक मोहन येवले यांचेसह श्री साईनाथ रुग्णालयात उपचारासाठी आले होते. त्यावेळी एक अनोळखी इसम त्यांचेजवळ आला. त्याने मी तुमची राहण्याची व जेवणाची सुविधा करतो, मी शासनाचा माणूस आहे, असे म्हणून मी तुमचे पैसे व माझे पैसे माझे हाताने भरतो.

राजीव गांधी योजनेची तुमची फाईल तयार करुन देतो,असे म्हणून पंधराशे रुपये व उपचाराचे कागदपत्र, रिपोर्ट, केसपेपर घेवून निघून गेला. बराच वेळ झाला तरी सदर इसम परत आला नाही.म्हणून राजगुर यांनी संस्थानचे डॉक्टर व इतर कर्मचारी यांचेकडे चौकशी केली असता असा कोणताही इसम त्यांचेकडे आला नसल्याचे त्यांनी सांगितले.
त्यामुळे फसवणुक झाल्याची लक्षात आल्याने पेशंटचे मेहुणे मोहन पाराजी येवले यांनी संरक्षण अधिकारी साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी ता.राहता यांचेकडे लेखी तक्रारी अर्ज केला होता. सदर इसमाविरुद्ध प्रकाश लक्ष्मण रोहकले यांनी फिर्याद दिल्याने शिर्डी पोलीस स्टेशन भा.द.वि.४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी सतिश दगडु पाटील याचा कसोशीने शोध घेवून त्यास तात्काळ अटक करण्यात आली आहे.
त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने घाटी रुग्णालय औरंगाबाद तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथे देखील रुग्णांची फसवणूक केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सदर आरोपी याचेकडून दवाखान्याचे कागदपत्र असलेली फाईल त्यामध्ये पेशंटचे उपचाराचे कागदपत्र व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना असा मजकुर असल्याचे कागदपत्र जप्त करण्यात आले आहे.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|