अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:-दिव्यांगांसाठी अनामप्रेमने सुरू केलेले नोकरी आणि रोजगार प्रशिक्षण आणि स्पर्धा परीक्षा केंद्र, अंध आणि मुक बधीर शाळा, शेती आणि दुग्ध प्रकल्प यातून आजवर सुमारे 20 हजारांवर दिव्यांगाना नवजीवन, सरकारी नोकऱ्या आणि प्रतिष्ठा मिळाली.
दिव्यांगाना सोबत घेऊन केवळ लोकाश्रय आणि श्रमसाधनेतून साकारलेले अनामप्रेम संस्थेचे कार्य देशातील दिव्यांग विकास कार्याच्या इतिहासातील एक सोनेरी पान असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले. डॉ. गोऱ्हे, पद्मश्री नीलिमा मिश्रा, डॉ.रवींद्र सोमाणी,
डॉ.बापूसाहेब कांडेकर, डॉ.प्रकाश शेठ, डॉ.सायली आणि सी. ए. सतीश सोमण आदींच्या उपस्थितीत काल आदर्श अध्यापक भगवान रंगनाथ कुलकर्णी स्मृती भोजन मंदिर आणि त्यांच्यावरील भगवान गाथा, या स्मृतीग्रंथाचे लोकार्पण संपन्न झाले. निंबळक (ता. जि.नगर) येथील सत्यमेव जयते ग्राम प्रकल्पात हा कार्यक्रम संपन्न झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभेच्छा घेऊन त्यांचे सहकारी हिरेनभाई आणि सौ.स्वाती जोशी दिल्ली येथून आले होते .त्याच्या वाचनामुळे त्यामुळे एका छोट्या खेड्यात होत असलेल्या कार्यक्रमाचे स्वरूप राष्ट्रीय झाले. अहमदनगर एज्युकेशन सोसायटी मधील आदर्श शिक्षक असलेल्या भगवान रंगनाथ कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ
त्यांच्या पत्नी श्रीमती प्रमिला यांनी 5 हजार चौरस फुटांचे सुसज्ज भोजन मंदिर बांधून दिले. एका वेळी 300 दिव्यागांच्या भोजनाची, स्वयंपाक घर, साठवण सुविधा, येथे निर्माण करण्यात आल्या. स्वर्गीय कुलकर्णी सरांचा शिल्पकार विकास कांबळे यांनी तयार केलेला पुतळा येथे उभारण्यात आला.
विधान परिषद कार्यालयातून ऑनलाईन या कार्यक्रमात पूर्णवेळ सहभागी झालेल्या डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की,देशातील दिब्यांग युवा तसेच बालकांसाठी शिक्षण, रोजगार, चारित्र्य निर्माण आणि उपचार, या चतु:सुत्रीवर आधारीत कार्य सत्यमेव जयते ग्राम आणि आधारग्राम मार्फत अनामप्रेम संस्थेने केले.
त्याची प्रामाणिकता पाहूनच कष्ट आणि काटकसरीने जमवलेली आपल्या आयुष्याची गंगाजळी या उपक्रमांसाठी सहयोग म्हणून स्व.भगवान आणि श्रीमती प्रमिला कुलकर्णी या दाम्पत्याने दिली. शिक्षकी पेशाला कुलकर्णी दांपत्याने प्रतिष्ठा आणि अर्थ दिल्याचे डॉ.गोऱ्हे यावेळी म्हणाल्या.
मुंबई येथील सामाजिक संस्थांचे आधारस्तंभ अरुण रामचंद्र शेठ यांनी नमूद केले, की दिव्यांगांचे मॉंटेसरी ते विद्या वाचस्पती ,असे सर्व स्तरातील शिक्षण मोफत देणारे शिक्षापीठ येथे निर्माण होत आहे. यावेळी विविध १० जिल्ह्यातील शिक्षण घेणाऱ्या २०७ दिव्यांग विद्यार्थ्यांना यावेळी विद्या सहयोग,या उपक्रमांतर्गत शिष्यवृत्ती देण्यात आली.
मागील १० वर्षात अनामप्रेम संस्थेच्या दिव्यांगांसाठीच्या देशातील पहिल्या स्पर्धा परीक्षा केंद्राने निःशुल्क सहयोग दिव्यांगाना दिला. त्यामुळे सुमारे १२०० विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आले. शासकीय सेवांमध्ये शंभरावर दिव्यांग निवडले गेले. अशा 51 यशवंतांचा सन्मान यावेळी करण्यात आला. अनामप्रेम संस्थेच्या संघटक सौ.अनिता माने, विष्णू वारकरी, अजित कुलकर्णी,
अजित माने, राजीव गुजर, डॉ.अनिल पावसे आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले. पद्मश्री नीलिमा मिश्रा यांनी सकाळी स्वयंरोजगारातील संधी आणि आव्हाने, या विषयावर उदयोन्मुख दिव्यांग व्यावसायिकांना मार्गदर्शन दिले. अॅड.श्याम असावा दीपक बुरम, उमेश पंडूरे, आदींनी उपक्रमाचे आयोजन केले. प्रसन्न पाठक यांनी खुमासदार सूत्रसंचालन केले.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved