अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-नेमून दिलेल्या रुग्णालयांना रेमडेसिवीर इंजेक्शन वेळेत वितरित न केल्याने संगमनेर शहरातील चार मेडिकल स्टोअर्सला तहसीलदार अमोल निकम यांनी नोटीस बजावली आहे.
संगमनेर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून प्रशासन सतर्क झाले आहे.
प्रशासनाने विविध उपाययोजना राबविणे सुरू केले आहे. संगमनेर तालुक्यात गेले काही दिवसांपासून रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे.
शहरातील विविध रुग्णालयांना इंजेक्शन पुरवण्याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या; मात्र शहरातील तीन मेडिकलनी संबंधित रुग्णालयांना हे इंजेक्शन वितरित केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
याबाबत तक्रारी झाल्याने तहसीलदार अमोल निकम यांनी या चारही मेडिकल स्टोअर्सला नोटीस बजावली आहे.
खुलासा न आल्यास संबंधित खात्याकडे कारवाईबाबत प्रस्ताव पाठविण्यात येईल, असा इशारा तहसीलदारांनी दिला आहे. या नोटिसा बजावल्याने मेडिकल स्टोअर चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.