ऊस दर जाहीर न केल्याने श्रीरामपूर तालुक्यातील अशोक साखर कारखान्याच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशोक सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरु होवून 15 दिवस झाले तरी प्रशासनाने ऊस दर जाहीर केला नाही.
यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या आठ दिवसात दर जाहीर न केल्यास कुठलीही पूर्व सूचना न देता शेतकरी कारखान्यावर उसाचे टीपरं घेवून येतील,

असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखाना प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला. दरम्यान या संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की अशोकचा मागील वर्षीचा साखर उतारा 10.31 टक्के होता
त्यानुसार तोडणी वाहतूक वजा जाता या वर्षीची एफ.आर. पी. रक्कम सरासरी 2359 रुपये एवढी होते, जी संघटनेला मान्य नाही. कारण अशोक सहकारी साखर कारखान्याने मागील वर्षी उसाचे गाळप करतांना जास्त प्रमाणात साखर मळीत घातल्यामुळे साखर उतार्यात घट झाली आहे.
एक टन उसापासून संगमनेरने 4.46 टक्के मळी तयार केली त्या तुलनेत अशोकने 5.49 टक्के मळी तयार केली. याचा अर्थ अशोकच्या मळीत साखरेचे प्रमाण जास्त आहे.
त्यामुळे वाढीव तयार झालेल्या 10 लिटर इथेनॉल उत्पन्नाच्या 50 टक्के रक्कम म्हणजे प्रती टन 300 रुपये वाढीव ऊस दर मिळावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.
त्यामुळे 2021-22 च्या हंगामात 10.31 टक्के साखर उतार्याऐवजी 11.31 टक्के साखर उतार्यानुसार एफआरपी देण्यात यावी. अन्यथा मोठा संघर्ष होईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.