Ahilyanagar News : गुलीयन बॅरी सिंड्रोम नावाच्या आजाराने पुण्यात अनेक बाधित झाले आहेत. अहिल्यानगर शहरात एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र, अहिल्यानगरहून पुण्याला येणाऱ्या व जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असल्याने या आजाराबाबत दक्षता घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आदेश आयुक्त यशवंत डांगे यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत.
रुग्णालयात अशा प्रकारचे संशयित रुग्ण आढळल्यास त्वरित आरोग्य विभागास कळवावे, अशा सूचना आरोग्य विभागाने वैद्यकीय संघटना व रुग्णालयांना दिल्या गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात व पिंपरी चिंचवड शहरात गुलीयन बॅरी सिंड्रोम आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे.
हा संसर्गजन्य आजार नसल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये. शहरातून दररोज पुण्याला जाणाऱ्या व येणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. आरोग्य विभागाकडून शहरातील सातही आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना बैठक घेऊन दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
तसेच, शहरातील रुग्णालये व वैद्यकीय संघटनांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. या आजाराची लक्षणे असलेली रुग्ण आढळल्यास महापालिकेच्या आरोग्य विभागाला कळवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अशी आहेत लक्षणे
गुलियन बॅरी सिंड्रोम आजार शरीराच्या इम्युनिटी विरोधातच काम करू लागतो. त्यामुळेया आजाराला ऑटो इम्यून डिसऑर्डर म्हटले जाते. श्वास घेण्यास अडचण येणे, धाप लागणे, हात आणि पायांमध्ये मुंग्या येणे, हातापायातील ताकद कमी होणे, चालण्यात किंवा पायऱ्या चढण्यात अडचण, अशक्तपणा जाणवणे, गिळण्यास व बोलण्यास त्रास होणे ही त्याची प्राथमिक लक्षणे आहेत.
पाण्याचे नमुने तपासणीला पाठवणार
आरोग्य केंद्रांच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात अशा लक्षणांची रुग्ण आढळल्यास संपर्क साधण्यास सांगितले आहे. तसेच, रुग्णालये व वैद्यकीय संघटनांना सूचना देण्यात आल्या आहेत. विविध भागातील पाण्याचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी जिल्हा प्रयोगशाळेकडे पाठवण्यात येणार आहेत. – डॉ. सतीश राजूरकर, प्र. वैद्यकीय आरोग्य अधिकारी