अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- राज्यात सध्या सत्ताधारी मंडळींमधील काही वाद चव्हाट्यावर आला आहे. याच मुद्द्यावरून विरोधी पक्ष भाजपकडून सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यात आली आहे.
‘सध्या शिवसेनेचे मंत्री आणि लोकप्रतिनिधी तसेच नेत्यांचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीवरील विश्वास उडत चालला आहे. त्यांच्याशी युती करून आपण चूक केली, हे आता त्यांना कळून चुकले आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2019/05/Prof-MLA-Ram-Shinde-1.jpg)
अशा शब्दात भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. ‘राज्यात महाविकास आघाडीचे एकत्रित नव्हे तर तीन पक्षांची तीन सरकारे कार्यरत असल्याची स्थिती आहे.
कोण मंत्री काय निर्णय घेतोय, कोणता अधिकार कोणाला आहे, याचा कशाचाही ताळमेळ नाही. तिन्ही पक्ष आपापल्या पद्धतीने कारभार करीत आहेत, असेही शिंदे म्हणाले. भाजपच्या ओबीसी आरक्षण बचावतर्फे २६ जून रोजी राज्यात एकाचवेळी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.
त्याची माहिती देण्यासाठी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत शिंदे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. प्रा. शिंदे म्हणाले, ‘राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार वेळ काढूपणा करीत आहे. त्यामुळे ओबीसी, मराठा तसेच मागासवर्गीयांच्या आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला.
योग्य वेळी योग्य निर्णय न घेणे, न्यायालयात योग्य बाजू न मांडणे अशा सरकारच्या निष्काळजीपणामुळे हे प्रश्न निर्माण झाले आहेत. न्यायालयाशी संबंधित प्रकरणे असली तरी त्यात सरकार म्हणून बाजू मांडण्यात सरकार कमी पडले आहे.
भाजपचे सरकार होते, तेव्हा हीच मंडळी राज्य सरकारकडे आरक्षणासाठी भांडत होती, आता न्यायालय आणि केंद्र सरकरकडे बोट दाखवित आहेत. मात्र, विरोधी पक्ष म्हणून आमची त्यांना उघडे पाडण्याची जबाबदारी आहे. तेच काम आम्ही करीत आहोत.
त्यामुळे २६ जूनला सकाळी ११ वाजता राज्यातील एक हजार ठिकाणी एकाचवेळी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.’
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम