अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:-अहमदनगर शहराच्या शहरासह उपनगरांत भुरट्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला. काल एकाच रात्रीत ३ ठिकाणी घरफोड्या करत रोख रक्कमेसह दागिणे, मोबाईल असा ऐवज चोरून नेल्याच्या घटना शुक्रवारी घडल्या आहेत.
एकाच दिवशी या घटना घडल्यामुळे नागरिकांत चांगलीच भीती पसरली आहे. यातील पहिली घटना केडगाव उपनगरातील अंबिकानगर परिसरातील गणपती मंदिराजवळ राहणाऱ्या प्रसाद गोविंद वालवडकर यांच्या घरात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चार चोरटे घुसले.
त्यांनी वालवडकर कुटूंबियांना चाकूचा धाक दाखवत त्यांच्या घरातील सोन्याची अंगठी बळजबरीने हिसकावून चोरून नेली. घरफोडीची दुसरी घटना केडगाव उपनगरातीलच शाहूनगर परिसरातील शंभु गार्डनजवळ घडली.
येथील राहुल आनंदा गरबडे हे घरात झोपलेले असताना अज्ञात चार चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश करत ४ हजार६४० रूपयांची रोख रक्कम तसेच १० हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरून नेला.
तिसरी घटना सावेडी उपनगरातील लेखा नगर परिसरातील संकटमोचन हनुमान मंदिराच्या पाठीमागील घडली. येथील रामराव दादाबा काकडे यांच्या घरी गुरूवारी ते शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान झाली.
काकडे हे घरात झोपलेले असताना अज्ञात चार चोरट्यांनी मुख्य दरवाजाचा कडी व कोयंडा तोडून घरात प्रवेश केला व घरातील सामानाची उचकापाचक करीत घरातील १ हजार ५०० रूपये रोख रक्कम, ७ भार वजनाचे चांदीचे २ पैंजण, ५०० रूपये किंमतीचे टायटनचे घड्याळ असा ऐवज चोरून नेला.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|