किरकोळ कारणावरून तेरा वर्षाच्या मुलाला दोघांकडून मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- किरकोळ कारणावरून एका तेरा वर्षाच्या मुलासह त्याच्या आई- वडिलांना दोघाजणांकडून मारहाण झाल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील रांजनखोल गावात घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रांजनखोल गावामध्ये राहणारा मुलगा दुर्गेश आप्पासाहेब ओव्हाळ (वय -13 , रा.रांजनखोल) याला त्याचे शेजारी राहणारे एकनाथ जगताप (वय-६९) व अशोक जगताप (रा.रांजनखोल) यांनी झाड तोडल्याच्या कारणावरून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

तसेच दुर्गेश याचे आई-वडील यांना देखील यावेळी मारहाण करण्यात आली. या मारहाणीत दुर्गेश हा जखमी झाल्याने त्याला शहरातील साखर कामगार हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. तेथे त्याने दिलेल्या जबाबावरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच याच प्रकरणी क्रॉस तक्रारीमध्ये एकनाथ रघुनाथ जगताप यांनी देखील दुर्गेश व त्याचे वडील अप्पासाहेब तसेच इतरांविरुद्ध तक्रार दिल्याने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात याबाबत देखील क्रॅास गुन्हा दाखल करण्यात आला आहे.