अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- संगमनेर तालुका सहकारी दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात आधार मिळावा, यासाठी जनावरांना चारा पिकासाठी ११० मेट्रिक टन मोफत बियाणे देण्याचा निर्णय घेतला
असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ महानंदचे व राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकात दिली.देशमुख म्हणाले की, जगभरात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे.
कोरोनाचा सर्वच उद्योगधंद्याना व दुग्ध व्यावसायाला देखील मोठा फटका बसला आहे. शहरातील व ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्यामुळे व हॉटेल, मंदिर, महाविद्यालय, शाळा व इतर सर्व व्यवसाय तसेच लग्न बंद असल्यामुळे दुधाची मागणी कमी झाली आहे.
त्याचा तोटा दूध संघ व दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. दूध उत्पादक हा दूध संघाचा पाया असून नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अडचणीच्या काळात दूध उत्पादकांना मदत व्हावी यासाठी राजहंस दूध संघाने राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडे चारा बियाणे मागणी केली होती.
त्यापैकी ११० मेट्रिक टन बियाणे प्राप्त झाले असून येत्या चार पाच दिवसात मका, ज्वारी, बाजरी, गवत या चारा पिकांचे बियाणे स्थानिक दूध संस्थाच्या माध्यमातून दुध उत्पादक शेतकऱ्यांना मोफत दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम