सासरी होणाऱ्या छळास कंटाळून विवाहितेने स्वतःला संपविले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये आजकाल जास्तच वाढ झालेली पाहायला मिळत आहे. अत्याचार, छेडछाड, विनयभंग अशा घटना घडू लागल्याने महिलांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे.

यातच कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मात्र या वाढत्या घटनांमुळे महिला आत्महत्येचे प्रमाण देखील वाढले आहे. चारित्र्याच्या संशयावरून वारंवार सासरी होणार्‍या छळास कंटाळून संगमनेर तालुक्यातील पिप्रीं-लौकी अजामपूर येथील विवाहित महिलेने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात मयत शारदा हिचे वडील दगडू सानप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विवाहितेचा पती जयराम चांगदेव गिते व भाया संतोष चांगदेव गिते यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, पती जयराम गिते व भाया संतोष गिते हे दोघे जण शारदा हिला लग्नानंतर एक वर्षापासून चारित्र्याचा संशय घेत किरकोळ कारणावरून वारंवार मारहाण करत होते. याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात सप्टेंबर 2020 मध्ये महिलेने पती विरोधात तक्रार दिली होती.

त्यानंतर नातेवाईकांच्या मध्यस्थीने ती पुन्हा नांदायला गेली होती. घरची परिस्थिती बेताची असल्याने ती रुग्णालयात नोकरी करत होती. परंतु चारित्र्याचा संशय घेऊन तिला वारंवार शिवीगाळ व मारहाण करून नोकरी सोडण्यास भाग पाडले होते.

किरकोळ कारणावरून शारदा हिला मारहाण करत आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्यामुळे गुरुवारी मध्यरात्री शारदाने विषारी पदार्थ घेतला. तिला प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

मयत महिलेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून आश्वी पोलीस ठाण्यात जयराम चांगदेव गिते व भाया संतोष चांगदेव गिते यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe