Monsoon Tourism : वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढली

Sonali Shelar
Published:
Monsoon Tourism

Monsoon Tourism : भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील आंबवडे खोऱ्यातील हिरवाईने नटलेल्या डोंगर रांगांमधील किल्ले रायरेश्वर, तसेच आंबवड्याच्या झुलता पुलाकडे पर्यटकांची पर्यटनासाठी मागील आठवडाभरापासून आपोआप पावले वळली असून, उत्साही वातावरणात वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढली आहे.

भोर तालुक्यातील नसरापूरचे बनेश्वर मंदिर, नेकलेस पॉइंट, भाटघर धरण, नीरा देवघर धरण, वरंधा घाटातील खळखळणारे धबधबे, किल्ले रोहिडेश्वर, किल्ले रायरेश्वर, तसेच आंबवडेचा झुलता पूल या पर्यटन स्थळांवर दरवर्षी पावसाळ्यात राज्यातून पर्यटक गर्दी करत असतात.

यंदा भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटातील वाहतूक अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने बंद केल्याने पर्यटकांना वरंधा घाटमाथ्यावरील धुके, हिरवाईने नटलेले डोंगर, प्रवाहित झालेले लहान-मोठे धबधबे, तसेच अंगाला झोपणारी वाऱ्याची झुळूक याचा अनुभव घेता येत नसल्याने पर्यटकांनी आंबवडे खोऱ्यातील किल्ले रायरेश्वर आंबवड्याच्या झुलता पूल, तसेच पुरातन काळातील शंभू महादेवाचे मंदिर या पर्यटनस्थळांना पसंती दिली असून,

पर्यटनासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. जोडून आलेल्या सुट्ट्या शनिवार, तसेच रविवारमुळे हजारो पर्यटक गर्दी करत आहेत. पर्यटकांनी पर्यटनस्थळांवरती मौजमजा करावी. मात्र, जीवितास हानी पोहोचेल असे कृत्य करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे..

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe