अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-नुकतेच काही दिवसापूर्वी उघडलेले बाजार समितीच्या मुख्य प्रवेशव्दाराचे एका बाजूचे गेट शहर वाहतूक शाखेने मंगळवारी दुपारी पुन्हा बंद केले.
विनापरवानगी कुलूप तोडून गेट उघडणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करणार असून हे गेट बंद ठेवावे. असे पत्रच शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक विकास देवरे यांनी जिल्हा उपनिबंधक तसेच बाजार समितीच्या प्रशासनाला दिले आहे.
मार्केट यार्डचे अडीच वर्षापासून एका बाजूचे गेट बंद होते. ते बंद असलेले गेट शिवसेनेने नुकतेच कुलूप तोडून खुले केले होते. परंतु हे गेट उघडण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचा कोणताही आदेश नसल्याचे स्पष्ट करत बाजार समितीने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले होते.
मार्केट यार्डवरील गेट नं.१ ची एकेरी वाहतूक करण्यासाठी २०१८ मध्ये गेटची एक बाजू जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानेच बंद केले होते. हे गेट बंद असल्याने व्यापारी, शेतकरी आणि नागरिकांची गैरसोय होता होती.
त्यामुळे व्यापाऱ्यांनी हे गेट उघडण्याची मागणी केली होती. रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष खा. सदाशिव लोखंडे व जिल्हाधिकाऱ्याकडे त्या संदर्भात पाठपुरावाही केला होता.
मात्र याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. अखेर शिवसेनेने दि.४ फेब्रुवारी रोजी सकाळी बाजार समितीच्या गेटवर आंदोलन करत बंद गेटचे कुलूप तोडून गेट खुले केले होते.
या अनुषंगाने शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक विकास देवरे यांनी मंगळवारी जिल्हा उपनिबंधक तसेच बाजार समिती प्रशासनाला पत्र दिले असून,
जिल्हा सुरक्षा समितीच्या निर्णयान्वये बंद करण्यात आलेले गेटचे कुलूप तोडून काही समाजकंटकांनी गेटचा वापर वाहतुकीसाठी सुरू केलेला आहे.
त्यामुळे रस्ता सुरक्षा समितीच्या निर्णयाचा भंग होत असून त्या समाजकंटकांवर कारवाई केली जाणार आहे. तसेच विनापरवाना सुरू करण्यात आलेले मेनगेट बंद ठेवण्यात यावे, असेही या पत्रात पो.नि. देवरे यांनी म्हटले आहे.
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved