शिर्डीतील जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-शिर्डी नगरपंचायतने मोठ्या प्रमाणात वाढविलेली घरपट्टी, पाणीपट्टी, गाळाभाडे व इतर कर माफ करावे, यासाठी सत्ताधारी गटाच्या पदाधिकाऱ्यांनी माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची घेतलेली भेट म्हणजे शिर्डीतील जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप शिर्डीतील महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आला आहे.

नगरपंचायतला कर कमी करण्याचे अधिकार आहेत, तर मग मंर्त्यांना भेटून काय साध्य करणार? असा सवाल शिर्डीतील महाविकास आघाडीने केला आहे. महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेनेचे नेते कमलाकर कोते,

राष्ट्रवादीचे माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते, काँग्रेसचे शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शिर्डीत मार्च २०२० पासुन लॉकडाऊनच आहे. येथील व्यवसाय आजपर्यंत बंद आहेत.

भाविक येत नसल्याने येथील सर्व व्यवसाय आर्थिक संकटात सापडले आहेत. नगरपंचायतचे मुख्याधिकारी व सत्ताधारी गटास अनेकदा भेटुन करमाफी करावी, करात सवलत दयावी यासाठी मागणी केली. मोर्चे काढले, आंदोलन केले; मात्र याकडे दुर्लक्ष केले गेले.

उलट शिर्डी नगरपंचायतच्या वतीने दि. ३१ मार्चपर्यंत मालमत्ता धारकांना दादागिरी करून नळ कनेक्शन तोडून गाळे सील करून जनतेला त्रास दिला व मार्च संपल्यावर, सर्व वसुली करून झाल्यावर कर माफीसंदर्भात मंर्त्यांना जाऊन भेटले.

हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. नगरपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांनी नळपट्टी, घरपट्टी, गाळा भाडे व इतर कर वाढविले ते कमी करण्याचे सोडून राज्य सरकारवर जबाबदारी ढकलण्याचा केविलवाना प्रयत्न आहे.

केवळ महाविकास आघाडीचा दबाव व नागरिकांची मागणी वाढल्यामुळे नगर विकासमंत्री यांना भेटण्याचे फक्त नाटक केले आहे. शिर्डी नगरपंचायतीची आर्थिक परिस्थिती सक्षम आहे. नगरपंचायतीला १०० कोटींच्या आसपास निधी श्री साईबाबा संस्थानने गेल्या पाच वर्षात दिला आहे. १५ कोटीची २ बक्षीसे महाराष्ट्र सरकारकडून मिळाली,

दरमहा ४२ लाख ५० हजार रूपये स्वच्छतेसाठी संस्थांकडून निधी दिला जातो, आजपर्यंत शिर्डीचे प्रामाणिक नागरीक नियमितपणे कर भरतात, थकबाकी नाही. मग तेच प्रामाणिक नागरीक संकटात असताना नगरपंचायतीची मदत करण्याची जबाबदारी होती;

मात्र मदत तर केलीच नाही वरून थकबाकीवर दंड, व्याज लावून कारवाई केली. या सर्व अन्यायाचा जाब सत्ताधाऱ्यांना विचारला जाईल, असा इशारा महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेनेचे नेते कमलाकर कोते, संजय शिंदे,

शहराध्यक्ष सचिन कोते, राहुल गोंदकर, काँग्रेसचे डॉ. एकनाथ गोंदकर, शहराध्यक्ष सचिन चौगुले, अमृत गायके, उमेश शेजवळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधाकर शिंदे, रमेश गोंदकर, शहराध्यक्ष महेंद्र शेळके, निलेश कोते यांनी दिला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe