दुर्दैवी ! दोन वेगवेगळ्या घटनेत काळवीटासह हरिणाचा मृत्यू

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- बेसुमार वृक्षतोड, भक्ष्य व पाण्याचा अभाव यामुळे वन्यप्राणी मानवी वस्त्यांकडे धाव घेऊ लागले आहेत. मात्र, लपायला जागा नसल्यामुळे तसेच भक्ष्य मिळविण्यासाठी प्राणी मानवीवस्तीकडे येऊ लागली आहे.

यातच अनेकदा वाहनांच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना देखील घडतात. असाच काहीसा प्रकार नगर जिल्ह्यात घडला आहे. नगर-औरंगाबाद महामार्गावर जेऊर (ता. नगर) शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत काळविटाचा मृत्यू झाला.

तर इमामपूर शिवारात विहिरीत पडून हरिणाचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, जेऊर शिवारात लिंगाडे वस्तूजवळ वाहन धडकेत काळविटाचा पाय फ्रॅक्चर झाला.

वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. राजेंद्र ससे यांनी जखमी काळविटावर उपचार केले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन जखमी काळविटास नगर येथील वनविभाग कार्यालयात आणले.

तेथे उपचार सुरू असताना या काळविटाचा मृत्यू झाला. तसेच इमामपूर शिवारात बहिरोबा मळ्यातील बहिरू आवारे यांच्या शेतातील विहिरीत पडून हरिणाचा मृत्यू झाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe