दुर्दैवाने ‘ती’ त्यांची शेवटचीच भेट ठरली !

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:- मित्राला भेटण्यासाठी आलेल्या एका तरुणाचा उसाच्या ट्रॅक्टरखाली दबून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कोपरगाव तालुक्यात घडली आहे. कल्पेश प्रकाश भाले (वय २४), असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी रवी गोकुळ बारवाल ( वय २१, रा. हाजीपूरवाडी, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद ) याच्या फिर्यादीवरून चालक दीपक सखाहरी दिवेकर (रा. शिवूर, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद) याच्याविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर असे की, मयत कल्पेश भाले व रवी बारवाल हे दोघे श्रीरामपूर येथून कोपरगाव तालुक्यात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर चालक असलेला त्यांचा मित्र दीपक दिवेकर याला दुचाकीवरून भेटण्यासाठी आले होते.

या तिघांची पुणतांबा फाटा येथे भेट झाली. त्यानंतर तेथून ऊस आणण्यासाठी जात असलेला दीपक दिवेकर व मयत कल्पेश भाले हे दोघे ट्रॅक्टरवर बसून रस्त्याने जात होते. तर रवी बारवाल हा त्यांच्या मागे दुचाकीवरून जात होता.

पुढे गेल्यानंतर कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ते वारी रस्त्यावर संवत्सर शिवारात ट्रॅक्टर उलटला. त्याखाली कल्पेश व चालक दीपक हे दोघे दबले असल्याचे रवी बारवाल याच्या लक्षात आले. त्याने स्थानिकांची मदत घेऊन दोघांनाही बाहेर ओढून काढले.

यात चालक दीपक यास काही प्रमाणात दुखापत झाली होती. तर कल्पेश यास जास्त दुखापत झाल्याने तो बेशुद्ध होता. त्यास उपचारासाठी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. घटनेचा अधिक तपास ए. एम. दारकुंडे करीत आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|